Annamalai On Raj Thackeray Challenge Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Updates: दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Sarkarnama Headlines Updates : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा सर्वच राजकीय पक्षांनी धुरळा उडवला असून आज या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज प्रचाराच्या तोफा थंडावरणार आहेत. यासह देशासह राज्यातील 13 जानेवारी 2025 च्या दिवसभरातील सर्व राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

निवडणुकीचा तापलेला प्रचार थंडावला अन् पावसाचाही झाला शिडकावा!

आज राज्यात महापालिका निवडणुकांचा तापलेला प्रचार थंडावला त्यानंतर रात्री पुणे शहरातील विविध भागात पावसाचा शिडकावा झाला. यामध्ये लोहगाव, उरुळी कांचन, हडपसर तसंच पिंपळे निलख औंध परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या.

भाजप नेते अन्नामलाईंचं मनसेप्रमुख राज ठाकरेंना आव्हान, म्हणाले,'मी मुंबईला येईन...'

भाजप नेते अन्नामलाई यांनी 'मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर ती देशाची आर्थिक राजधानी आणि एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे हे शहर योग्य लोकांनी चालवले गेले पाहिजे अशी टिप्पणी केली होती. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अन्नामलाई यांच्यावर टीका करताना ‘एक रसमलाई तमिळनाडूतून आली आहे… तुझा इथे काय संबंध? हटाओ लुंगी, बजाओ पुंगी’ असं प्रत्युत्तर दिलं होतं. आता अन्नामलाई यांनी राज ठाकरेंना आव्हान देतानाच ‘मी मुंबईला येईन, माझे पाय कापून दाखवा’ असं आव्हान दिलं आहे.

'पक्ष संपवला म्हणून बाळासाहेब ठाकरे फडणवीसांना आशीर्वाद देतील का?'; अविनाश जाधवांचा फडणवीसांना चिमटा 

मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर पलटवार केला आहे. नाशिक महापालिकेचा काही काळ सोडला, तर इतर वेळेला फडणवीसांकडेच सत्ता होती. तेव्हा त्यांनी तिथं का काही केलं नाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे. 'पक्ष संपवला म्हणून बाळासाहेब ठाकरे फडणवीसांना आशीर्वाद देतील का?'; अविनाश जाधवांचा फडणवीसांना चिमटा  अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.

Ajit Pawar : खासदार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत आणि दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र येणार नाहीत : अजित पवार

पुणे, पिंपरी चिंचवड आणि परभणी महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे, त्यामुळे दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा राज्यात सुरू होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही शक्यता फेटाळून आली आहे. तसेच सुप्रिया सुळे ह्या इंडिया आघाडीत असून आम्ही एनडीएमध्ये आहोत, त्यामुळे सुप्रिया सुळे ह्या केंद्रात मंत्री होणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Arjun Khotkar : भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झाली आहे : अर्जून खोतकर

ज्यांच्या मतदारांवर तुम्ही आमदार झालात, मलाई खाल्ली. त्या मतदारांना धोका दिला आहे. भाजपची काय अवस्था आहे. त्यांची ६५ उमेदवारांची यादी पाहिल्यानंतर ४५ उमेदवार हे काँग्रेसमधून आयात झालेले आहेत. मूळ भाजपला १७ ते १८ च जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे भाजपची काँग्रेस झाली असं आम्ही का म्हणू नये, असा सवाल शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांनी केला आहे.

Amit Thackeray : दुबार मतदान करायला येणाऱ्यांना तिथंच झोडा : अमित ठाकरे

दोन भाऊ एकत्र आल्यानंतर जे वातावरण बघायला मिळालं आहे, तसं वातावरण मी आयुष्यात पाहिलं नव्हतं. तसंच राज्यातील सत्ताधारी ज्या विकृतपणे निवडणुकीत उतरले आहेत, तसं वातावरण मी आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं. सत्ताधाऱ्यांचा माज आपल्याला उतरवायचा आहे. दोन भावांना घाबरून निवडणुका बिनविरोध करता. मुंबईत दोन भावांचाच महापौर बसणार आहे. दुबार मतदार करायला येणाऱ्यांना तिथंच झोडा, असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले आहे.

ZP Election : राज्यातील 'या' 12 जिल्हा परिषदेच्या 05 फेब्रुवारी रोजी होणार निवडणुका

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्याची निवडणूक आज राज्य निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पाच, मराठवाड्यातील चार आणि कोकणातील तीन जिल्हा परिषदांचा समावेश आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांचा त्यामध्ये समावेश आहे.

उमेदवारी अर्ज स्वीकृती : १६ ते २१ जानेवारी

उमेदवारी अर्जाची छाननी : २२ जानेवारी

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : २७ जानेवारी

चिन्हवाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी : २७ जानेवारी

मतदान : ५ फेब्रुवारी

मतमोजणी : ७ फेब्रुवारी

ZP Election : राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 05 फेब्रुवारीला मतदान, 07 फेब्रुवारीला मतमोजणी

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या झेडपी आणि पंचायत समितीत ता. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. ता. १६ जानेवारीपासून २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी २२ जानेवारी रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २७ जानेवारीपर्यंत असणार आहे. उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हाचे वाटप २७ जानेवारी रोजी दुपारी तीन पर्यंत असणार आहे. तसेच उमेदवारांची यादी २७ जानेवारी रोजी असणार आहे.

ZP Election : राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125पंचायत समित्यांमध्ये निवडणूक होणार; निवडणूक आयोगाची घोषणा

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि125 पंचायत समित्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा केली आहे. या जिल्हा परिषदांमधील आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांच्या आतमध्ये आहे. उर्वरीत जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Nagar palika Election : शहादाच्या उपनगराध्यक्षपदी माधवी पाटील

शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या माधवी मकरंद पाटील यांची निवड झाली. उपनगराध्यक्षांसोबतच स्वीकृत नगरसेवकांचे देखील निवड करण्यात आली असून भाजपकडून कल्पेश रमणलाल पटेल आणि यशवंत गणेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर जनता विकास आघाडीकडून जितेंद्र जमदाडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

PMC Election : गल्लीबोळात दादा तयार करण्याची निवडणूक नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. काही लोकांना ही निवडणूक गल्लीबोळात दादा तयार करण्याची निवडणूक वाटत आहे. ही निवडणूक शहराचे नेतृत्व तयार करण्याची आहे. विकासाच्या नावाखाली बिनडोक कामे केली, विद्यापीठ चौकातील पूल पाडावा लागला, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

BMC Election : तेजस ठाकरे आईसोबत प्रचाराच्या मैदानात

मुंबईत प्रभाग क्रमांक २२० च्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-महाराष्ट्र नवनिर्माण सेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या उमेदवार संपदा मयेकर यांच्या निवडणूक कार्यालायाला रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी भेट दिली.

ZP Election : निवडणुकांची आजच घोषणा

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आजच घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यामध्ये आयुक्त दिनेश वाघमारे निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करतील.

BMC Election : अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंकडून शाखाभेटींवर भर

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून शाखा भेटींवर भर दिला जात आहे. आजही त्यांच्याकडून अनेक शाखांना भेट दिल्या जात आहेत.

 Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिण्यांच्या खात्यात पैसे जमा

महापालिका निवडणुकीच्या दोन दिवस आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. हा हप्ता डिसेंबर महिन्याचा आहे. जानेवारी महिन्याचा हप्ताही जमा करण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र, निवडणूक आयोगाने त्यास नकार दिल्याने एकाच महिन्याचा हप्ता जमा झाला आहे.

पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात दुपारी २ वाजता घेणार पत्रकार परिषद.

Mahapalika Nivadnuk: प्रचाराचा आज शेवटचा दिवस, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची बाईक रॅली  

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अंतिम दिवसाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि उमेदवारांनी जोरदार प्रचार करत आपली ताकद दाखवण्यावर भर दिला आहे. नागपूर शहरात भाजपच्या वतीने भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीद्वारे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. त्यांनी स्वतः दुचाकी चालवत रॅलीत सहभाग घेतला.

Nashik: भाजपकडून माजी महापौर, नगरसेवकांसह 54 बंडखोरांचे निलंबन

नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीत मोठी माहिती समोर येत आहे. भाजपने 54 बंडखोरांची हकालपट्टी केली आहे. यात माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

PUNE CONGRESS LIVE: पुणे काँग्रेसकडून 20 जणांची हकालपट्टी

काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी महापौरसह अनेकांनी अन्य पक्षातून उमेदवारी स्वीकारली काहींनी पक्षप्रवेश केला तर काहींनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार ही सुरू केला आहे, याची गंभीर दखल घेऊन प्रदेश काँग्रेसने 20 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केले आहे.

Mahapalika Nivadnuk: प्रचाराचा आज शेवटचा

महापालिका निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज प्रचार सभा, रॅली आहेत. नेत्यांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गाठी गाठीभेटी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे.

MNS LIVE: पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रचार रॅली

मनसे प्रमुख राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. ठाकरे सेना आणि मनसे उमेदवारांसाठी ते रॅली काढणार आहे. मनसेच्या उमेदवारांशी ते संवाद साधणार आहेत.

Annamalai On Raj Thackeray : 'मी मुंबईत येणार.. हिंमत असेल तर अडवा; अण्णामलाईंचं ठाकरेंना आव्हान

राज ठाकरे यांच्या टीकेनंतर के. अण्णामलाई यांनी, 'मला मुंबईत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मी मुंबईत येणारच. हिंमत असेल तर माझे पाय तोडून दाखवा,' ठाकरेंना आव्हान दिलं आहे. त्यामुळे भाजपविरुद्ध ठाकरे बंधू यांचा संघर्ष महापालिका मतदानाच्या एक दिवस अगोदर अधिक उफाळला आहे.

BMC Election : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच या निर्णयाच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी 'दक्षता पथक' स्‍थापन केले आहे.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुचाकी चालवत आज रोड शो करणार

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुचाकी चालवत करणारा रोड शो करणार आहेत. इतवारी भारत माता चौक ते महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा हा रोड शो असणार आहे.

Municipal election campaign. : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा आज थंडावणार

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा सर्वच राजकीय पक्षांनी धुरळा उडवला असून आज या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज प्रचाराच्या तोफा थंडावरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT