महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 14 पोलीस उपायुक्त, 30 सहाय्यक पोलीस आयुक्त, सात परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस आयुक्त, 166 पोलीस निरीक्षक, 723 सहाय्यक पोलीस निरीक्षक, बारा हजार पाचशे पोलीस उपनिरीक्षक, 3250 होमगार्ड आणि एस आर पी एफ च्या चार तुकड्या असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
निवडणुकीच्या वादातून मालेगावमध्ये एमआयएमच्या उमेदवारावर हल्ला करण्यात आला. मालेगावमधील मुंबई-आग्रा महामार्गावर काल रात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलिंग एजंटच्या कामासाठी जाऊन परत येत असताना प्रभाग क्रमांक ४ मधील एमआयएमचे उमेदवार विशाल अहिरे यांच्यावर हल्ला करण्यात आला.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी बिनविरोध निवडणूक आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती, ही याचिका कोर्टाने फेटाळले आहे.
पुणे महानगरपालिकेसाठी उद्या मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून मतपेट्या आणि मतदान साहित्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. शहरातील एकूण 4 हजार 11 मतदान केंद्रांवर मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य पाठवले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. कालच आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.
मतदारांना पैसे वाटण्यावरून भाजप आणि शिवसेनेते मोठा राडा झाला. भाजप उमेदवाराचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर आणि शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शिवसेना उमेदवारांना अटक करण्याची मागणी करत आंदोलन केले होते या मागणीनंतर मध्यरात्री पोलिसांनी रवी पाटील आणि नितीन पाटील त्यांचा उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातून यांना ताब्यात घेतले.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली होती आणि आता मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचार संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी दिली. अशा प्रकारचा निर्णय हा पहिल्यांदाच होत असून हा निर्णय म्हणजे घरोघरी जाऊन लक्ष्मीदर्शनासाठी दिलेली अधिकृत मंजुरीच आहे. यावरुन कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासासाठी भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यात साटंलोटं झाल्यांचं दिसतंय, पण स्वाभिमानी मतदार हा डाव नक्की हाणून पाडतील, असा विश्वास आहे, असे ट्विट रोहित पवारांनी करत भाजपवर टीका केली.
"आपण निवडणूक नव्हे तर गद्दार आणि भ्रष्टाचाराच्या वृत्तीविरोधात लढतोय. आपली मराठी अस्मिता मारण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्या भाषेवर आक्रमण होत आहे. ही गद्दारी आणि महाष्ट्रद्रोही वृत्ती असून या वृत्तीचा पराभव करण्यासाठी मशालीला मत द्यावे लागेल. निवडून दिलेले गद्दार निघतात, मात्र, निवडून देणारे कधीही गद्दार नाहीत, हे दाखवणारी ही निवडणूक आहे," असं भावनिक आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि मतदारांना केलं आहे.
पूजा खेडकरच्या बंगल्यावर दरोडा प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलिसांनी मुंब्रातून एकाला अटक केली आहे. खुम्मा दिलबहादुर शाही (वय ४० रा. कौशल मुंब्रा जि.ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी उमेदवार प्रतिनिधींची बैठक घेणार असून ते यावेळी उमेदवारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर या बैठकीनंतर राज ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात 30 लाख मतदार हक्क गाजवणार आहेत. या निवडणुकीसाठी 3605 मतदान केंद्र असणार आहेत. पुणे जिल्हा परिषद च्या 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 गणासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात 29 लाख 76 हजार 454 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
पनवेल महानगरपालिका प्रभाग 17 मध्ये भाजप कार्यकर्त्यांना पैसै वाटप करताना मनसे कार्यकर्त्यांनी पकडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भाजपकडून मतदारांना पैसे वाटप केली जात असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.