Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : हप्ता बंद झाल्याने लाडक्या बहिणी रस्त्यावर, हिंगोलीत मोर्चा

Maharashtra PoliticalNews : महापौरपदासाठी आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर यासह आज सोमवार 19 जानेवारी रोजीच्या राजकीय अपडेट्स जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

Ladki bahin Yojana : हप्ता बंद झाल्याने लाडक्या बहिणी रस्त्यावर

हिंगोलीत 'लाडकी बहीण' योजनेचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. 'निवडणुकीनंतर सरकारची बहीण दोडकी झाली का?' असा सवाल विचारत पाचही तालुक्यातील शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हप्ता सुरू होईपर्यंत न उठण्याचा पवित्रा महिलांनी घेतला असून, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रय़त्न सुरू आहे.

Mayor Reservation : आरक्षण सोडत २२ जानेवारीला 

महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला निघणार आहे. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आरक्षण सोडत काढली जाईल.

BMC Mayor : नगरसेवकांनी मुंबईतच थांबावे

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार, हे स्पष्ट आहे. पण त्यासाठी अद्याप आठवडाभराचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पुढील आठ दिवस मुंबईतून बाहेर जाऊ नका, अशा सूचना पक्षाच्या नेत्यांनी नगरसेवकांना दिल्याचे समजते.

KDMC mayor : नगरसेवक माजी खासदारांच्या संपर्कात

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यांनी सर्व नगरसेवकांची भेट घेतल्याचेही समजते. नगरसेवक नॉटरिचेबल असल्याची जोरदार चर्चा कल्याण डोंबिवलीमध्ये आहे.

Kalyan-Dombivli Mayor Election : 11 नगरसेवक अज्ञात स्थळी

कल्याण डोंबिवली महापालिकेवर महायुतीचे स्पष्ट बहुमत असले, तरी एकनाथ शिंदे शिवसेना अन् भाजपकडून स्वबळावर महापौर बसवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेनेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षासह मनसेच्या नगरसेवकांना गळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे सेनेने बचावत्मक पवित्रा घेतला असून, नवनिर्वाचित नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवलं आहे.

Jalgaon Update : जळगावच्या नशिराबाद इथं दोन गटात तुफान हाणामारी

जळगावच्या नशिराबाद इथं नगरपालिका निवडणुकीतील कामावरून दोन गटात तुफान हाणामारी होऊन, दगडफेकीची घटना झाली. दोन्ही गटांकडून दगड, विटांचा तसेच लाठ्याकाठ्या, पाइप, कुऱ्हाडीचा वापर झाल्याने, यात तब्बल 16 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नशिराबाद पोलिस ठाण्यात दोन्ही गटाच्या परस्पर तक्रारीवरून 30 ते 35 जणांविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले आहे.

Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्यावर उधळलेल्या नोटांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल

छत्रपती संभाजीनगरसह राज्यात 'AIMIM'ला मिळाल्या यशाबद्दल, प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर त्यांच्या समर्थकांनी पैशाची उधळण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यानंतर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

BMC Mayor 2026 : मुंबईसाठी कुणाला महापौर करायचं हे भाजप अन् गौतम अदानी ठरवतील

'मुंबईसाठी कुणाला महापौर करायचं हे भाजप आणि गौतम अदानी ठरवतील. ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिले आहेत. त्यानुसार भाजप कितीही विजय करत असला, तरीही त्यांचा विजय झाला नाही,' असंही संजय राऊतां यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची मुंबईच्या महापौरपदासाठी चर्चा झाल्याची, या सगळ्या वृत्तपत्रातील बातम्या असून, त्या सूत्रांवर आम्ही विश्वास ठेवत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Malegaon Municipal : मालेगाव महापालिकेत सत्तेस्थापनासाठी 'AIMIM' अन् इस्लाम पार्टी-समाजवादी पार्टीची युती होणार

नाशिकच्या मालेगाव महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या इस्लाम पार्टी-समाजवादी पार्टीच्या युतीला महापौर पदासाठी केवळ 3 सदस्यांची गरज आहे. मात्र मालेगाव शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी इस्लाम पार्टीच्या असिफ शेख यांनी आवाहन केले आहे. 'AIMIM'चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी युतीच्या चर्चेसाठी आम्ही तयार असून इस्लाम पार्टीकडून तसा प्रस्ताव आल्यास नक्की शहराच्या विकासाबद्दल मदत करू, अशी भूमिका घेतल्याने ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Nandurbar Crime : अक्कलकुवा पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पाच ठिकाणी धाडसी घरफोडी...

अक्कलकुवा शहरात चोरांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत, पाच ठिकाणी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, अक्कलकुवा पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस वसाहतीतील एका कर्मचाऱ्याचे घरही चोरांनी लक्ष्य केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Sangamner Update : वाळू वाहतुकीचा 'रील' व्हायरल करत प्रशासनाला आव्हान

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस घातला आहे. सोशल मीडियावर 'रील' व्हायरल करत प्रशासनाला थेट आव्हान दिलं आहे. संगमनेरच्या पिंपरणे परिसरातील वाळू माफियाचे थेट महसूल प्रशासनाला आव्हान दिल्याने, प्रशासनाच्या कारभाराविषयी चर्चांना तोंड फुटलं आहे. वाळू वाहतूक करतानाचा 'रील' व्हायरल झाल्याने प्रशासन नेमकं करतंय काय, असा प्रश्न नागरिक करत आहेत.

Sangali Politics : सांगली महापालिका निवडणुकीत ​पती-पत्नीची विजयाची 'हॅट्ट्रिक'; सलग तिसऱ्यांदा विजय

सांगली महापालिका निवडणुकीमध्ये पती-पत्नी सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. काँग्रेसकडून मेंढे दांपत्याने ही विजयाची हॅट्रिक केली आहे. मिरजेच्या प्रभाग क्रमांक पाच मधून संजय मेंढे व त्यांची पत्नी बबीता मेंढे हे दोघेही सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. सांगली महापालिकेत निवडून जाणारे मेंढे दाम्पत्य एकमेव ठरले आहे. सांगली महापालिका निवडणुकीमध्ये यंदा सहा दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

एमआयएम जिल्हा परिषद स्वबळावर लढणार

एमआयएम पक्षाचे महापालिका निवडणुकीत तब्बल 125 नगरसेवक निवडून आले. आता सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 25 जागा एमआयएम स्वबळावर लढविणार आहे. सोलापूर महानगरपालिकेत त्यांचे 8 नगरसेवक विजयी झाले होते.

ठाकरेंचे तीन नगरेसवक फुटले?

हापौरपदासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत सुरू असलेल्या रस्सीखेचमध्ये शिंदेंनी ठाकरेंना मोठा दणका दिला आहे. शिंदेंनी कल्याण-डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंचे तीन नगरसेवक फोडल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

ठाकरेंचे नगरसेवक अज्ञातस्थळी

कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये महापौरपदासाठी शिंंदे शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ लागली आहे. या घडामोडींमध्ये ठाकरेसेनेचे ११ नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झालेत. शिंदेसेनेला महापौरपदासाठी ९ नगरसेवकांची गरज असल्याने ठाकरेसेनेच्या नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. अशात ठाकरेसेनेने ११ नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवलंय...

अनेक वर्षे रखडलेला श्री मलंगगड फ्युनिक्युलर प्रकल्प अखेर मार्गी

गेले अनेक वर्षे रखडलेला श्री मलंगगड फ्युनिक्युलर प्रकल्प अखेर मार्गी लागला असून, ही सेवा आता अधिकृतपणे भाविकांच्या सेवेत दाखल झाली आहे. देशातील सर्वात लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचे रविवारी भाजपा आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक संभाळावे, एकनाथ शिंदे यांचा इशारा

शिंदे यांना नगरसेवक फूटण्याची भीती असल्याचे राऊत म्हणाले होते. त्याला शिंदेंनी प्रत्युत्तर देताना म्हणाले की, ठाकरेंनाच त्यांचे नगरसेवक फूटण्याची भीती आहे. त्यांनी त्यांचे नगरसेवक संभाळावेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT