हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर नागपूर अधिवेशनाच्या काळात लाखो शेतकऱ्यांना घेऊन ट्रॅक्टर मोर्चा काढून विधिमंडळाला वेढा घालू. असा इशारा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत फारूख अब्दुल्ला यांनी मोठं विधान केलं आहे. ''स्थानिक पाठिंब्याशिवाय इतका मोठा हल्ला होऊ शकत नाही. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना स्थानिक लोकांचा पाठिंबा मिळाला असावा." असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिलचे पैसे मिळणार आहेत. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
अटारी बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. स्वतःच्याच नागरिकांना पाकिस्तान गेट उघडत नसल्याचे दिसतेय. भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना पाकिस्तानकडून एंट्री नाकारली जात आहे. तर काही पाकिस्तानी नागरिक दोन दिवसांपासून अटारी बॉर्डरवर अडकले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधला तणाव चांगलाच वाढला आहे. पाकिस्ताननं अटारी बॉर्डर बंद केली होती. पण पुन्हा एकदा अटारी बॉर्डरवरील दरवाजे पाकिस्ताननं खुले केले आहेत. सध्या फक्त पाकिस्तानी पासपोर्ट असलेल्या नागरिकांनाच पाकिस्तानात प्रवेश दिला जात आहे.
Bachchu Kadu : मुख्यमंत्री फडणवीसांच्या घरासमोर बच्चू कडू करणार आंदोलन
कर्जमाफीच्या मुद्द्यावर अजित पवार यांच्यानंतर आता बच्चू कडू पुढे पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. यात सर्वात शेवटी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे. 7 जुलैपासून तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकूंज मोझरी किंवा आपलं जन्मगाव असलेल्या कुरळपूर्णा येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शेकडो ट्रॅक्टर घेऊन शिवसैनिक या मोर्चात सहभागी झाले.
संतोष देशमुख यांच्या भगिनी प्रियंका चौधरी या आज विठुरायाच्या दर्शनासाठी आज पंढरपूरला आल्या होत्या. त्या म्हणाल्या, माझ्या भावाचा ९ डिसेंबर रोजी खून झाला. तेव्हापासून मी चप्पल सोडलेली आहे.जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत चप्पल घालणार नाही, भावाला लवकर न्याय मिळण्यासाठी विठुरायाला त्यांनी साकडे घातले.
आषाढी वारीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. देवाची आळंदी येथून 19 जून रोजी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. तर 5 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील भोसरी परिसरातून नोडल सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अमोल काळे (वय - 25) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.
राज्य सरकार सुमारे एक लाख कोटींच्या खर्चातून चार नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात 83 टीएमसी पाणी आणणार असून यातून गोदावरी खोरे कायमचे दुष्काळमुक्त होणार आहे, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी सांगितले. सरकारने मागील काही वर्षांत राज्यातील 182 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यातून 25 लाख 78 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले, असे प्रास्ताविकात दिपक कपूर यांनी सांगितले.
"माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे आम्हालाही वाटते. दोन्ही बाजूंचा विचार करून, त्या संदर्भात लवकरच निर्णय होईल. सर्जिकल स्ट्राइकसारखं उत्तर दिलं जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी संकेत दिले.
राज्याच्या महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. विशेष करून वैद्यकीय महाविद्यालयांमधील रॅगिंग रोखण्याबाबत सर्व जबाबदारी राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाची आहे. प्रत्येक राज्यात तो विभाग आहे. अनेक राज्यात त्या संदर्भातील कठोर कायदे करण्यात आले आहेत. आमच्याकडे काही तक्रारी आल्या, तर आम्ही नक्कीच त्या तक्रारी सोडवू, असे मंत्री प्रताप जाधव यांनी म्हटले.
वाशिममध्ये आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. वाशिम कृषि उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा हिंगोली नाका, पुसद नाका, पोस्ट ऑफिस चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात जिल्हा शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आदिवासी समाज देव, देश, धर्मासाठी जगणारा समाज आहे. समाजाच्यावतीने आज अभिवादन केले. राघोजी भांगरे यांची स्मृती जपण्यासाठी येत्या काळात मशाल यात्रा काढणार असून, आदिवासी समाजाच्या स्मृती जपण्यासाठी ठाणे कारागृहाला राघोजी भांगरे हे नाव देण्यासाठी सरकारला विनंती करणार आहे. तसंच क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा धडा पुस्तकात आला पाहिजे. सरकार आणि प्रशासनाला राघोजी भांगरे यांचा पुतळा बांधण्यासाठी सांगणार असल्याचे मंत्री अशोक ऊईके यांनी म्हटले.
पालकमंत्री ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे . संजय राऊत कोण? त्यांनी त्यांच्या आघाडीचं बघावं , आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नये, असं प्रत्युत्तर रायगडमधील शिवसेना मंत्री भारत गोगावले यांनी दिलंय. रायगडचे पालकमंत्रीपद गाव गुंडांकडे नसावं, मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे आलं, तर स्वागत करतो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांना फोन करून तसेच अश्लील मेसेज पाठवून त्रास देणाऱ्याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव अमोल काळे असे आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर द्यायला हवे. मात्र, पंतप्रधानांनी सर्व जबाबदारी लष्कराकडे दिली आहे. हे म्हणजे तुम लढो हम कपडे संभालते है, अशी परिस्थिती आहे. विरोधी पक्षांचा सरकारला पाठींबा आहे मात्र त्यांच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती नाही. जबाबदारी लष्करावर टाकून ते निवडणुकीच्या प्रचाराला फिरत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
अक्षय्य तृतीयेला लाडक्या बहिणींचा 1500 रुपयांचा हफ्ता जमा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, हफ्ता जमा झालेला नाही. त्यामुळे पैसे जमा होण्याची प्रतिक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना आहे.
माझ्यावर झालेले आरोप चुकीचे आहे. प्रमाणपत्र खोटं असल्याचे युपीएससीने कधीच म्हटले आहे. न्यायालयाकडून चुकीचे अर्थ काढले जाऊ शकतात त्यामुळेच मी वरील कोर्टात गेले, असे पुजा खेडकर म्हणाली.
पहलगाम हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम यांनी भारताताल जाहीर पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यानंतर अमेरिकेच्या व्हाईट व्हाऊसकडून निवेदन काढत भारताला आपल्या संपूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी सांगितले की, युद्धाच्या परिस्थितीमध्ये आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या संपर्कात आहोत.
पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्राच्या सायबर सेलने 10 लाख सायबर हल्ले नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. हे हल्ले प्रामुख्याने पाकिस्तानकडून करण्यात आले आहेत. या सायबर हल्ल्यामुळे बँकिंग आणि सरकारी पोर्टलसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील त्रुटी उघड झाल्या आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासोबतचे संबंध ताणल्यानंतर पाकिस्तान आता मुस्लिम देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आटापिटा करत आहे. अशातच पाकिस्तानने 57 देशांच्या गट ओआयसीने (इस्लामिक सहकार्य संघटना)पाकिस्तानला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. नुकतंच पाकिस्तानने ताज्या परिस्थितीबद्दल इस्लामिक सहकार्य संघटनेला माहिती दिली होती. त्यानुसार आता हे देश पाकिस्तानला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कारवाईचा इशारा दिल्यामुळे पाकिस्तान चांगलंच घाबरलं आहे. तरीही ते काही केल्या कुरापती करणं बंद करत नसल्याचं दिसत आहे. 1 आणि 2 मे च्या रात्री, जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूर भागातील नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
नागपुरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आलं आहे. याचा विदर्भातील 11 जिल्ह्यातील लोकांना फायदा होणार आहे. शिवाय त्यामुळे वैद्यकीय उपचाराच्या मदतीसाठी लोकांना आता मुंबईत जाण्याची आवश्यकता भासणार नाही. तसंच आर्थिकदृष्टया गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने हे विशेष कक्ष स्थापन करण्यात आलं असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं.
माजी आमदार अरुण काका जगताप यांचं पुण्यातगुरुवारी रात्री निधन झालं. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील अमरधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. अरुण काका जगताप हे 2016 ते 2022 पर्यंत विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते.
1 मे पासून महाराष्ट्रातील फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.