Maratha Kunbi caste certificate controversy; Manoj Jarange and Chandrashekhar Bawankule sarkarnama
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : ‘माझ्या पत्नीला, मुलांना, बहिणीलाही त्रास होतोय’; जरांगेंच्या टीकेने बावनकुळे भावूक, उत्तर देताना डोळ्यात पाणी

Chandrashekhar Bawankule On Manoj Jarange Over Caste Certificate Row : कुणबी जात प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेवरून मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांच्यावर आता सतत टीका करताना दिसत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : “माझ्यावर व्यंग करून त्यांना आनंद मिळत असेल तर मिळू द्या. मी काहीच बोलणार नाही. पण घरी बायको, मुलं, बहीण, माझं कुटुंब आहे. त्यांनाही याचा त्रास होतो,” अशा भावनिक शब्दांत मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होणाऱ्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले. उत्तर देताना भावूक झालेल्या बावनकुळे यांच्या डोळ्यात पाणी आल्याचेही दिसून आले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘माझी पत्नी कुणबी, आम्ही जात-पात करत नाही’ :

बावनकुळे म्हणाले, “माझ्यावर टीका करून न्याय मिळत असेल तर त्यांनी खुशाल टिंगल-टवाळी करावी. काय गैरसमज झाला आहे, माहिती नाही. पण मी कधी जाती-पाती करत नाही.” आपल्या कुटुंबाचा संदर्भ देत, “माझी पत्नी कुणबी आहे, सुनबाई मराठा आहे. आम्ही कुणबी, तेली, मराठा असा वाद करत नाही. आमचा पण परिवार आहे,” असे सांगताना बावनकुळे भावूक झाले.

कुणबी जात प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेवरही बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. “महसूलकडून कुणबी जात प्रमाणपत्र दिलं आहे. खात्याने एवढं काम केल्यानंतर जर व्यंग होत असेल तर याला काही अर्थ नाही. २२ लाख प्रमाणपत्रांमधील एक प्रमाणपत्र चुकीचं आलं होतं. त्यावरही मी चौकशी लावली होती. तेही क्लिअर झालं आहे. आताही कुणबी प्रमाणपत्रं रोज दिली जात आहेत,” असे बावनकुळे म्हणाले.

‘माझे आणि जरांगेंचे अनेकदा बोलणे झाले’ :

“माझे आणि जरांगेंचे अनेकदा बोलणे झाले आहे. पण एका प्रमाणपत्रामुळे गैरसमज झाले आहेत. तरीही माझ्यावर व्यंग करून आनंद मिळत असेल तर त्यांनी तो आनंद घ्यावा,” अशी उद्विग्नता बावनकुळे यांनी व्यक्त केली. जात वैधता प्रमाणपत्राचा विषय आपल्या अखत्यारित नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. “व्हॅलिडिटी माझं काम नाही, ते समाजकल्याणकडे आहे. कास्ट व्हॅलिडिटीमध्ये काय झालं असेल तर मला माहिती नाही,” असे त्यांनी सांगितले.

‘ओबीसींनी रस्त्यावर आंदोलन करू नये’ :

“ओबीसी आंदोलकांना विनंती करतो, कोणीही रस्त्यावर आंदोलन करू नका. सरकार म्हणून विनंती आहे की रस्त्यावर आंदोलन करू नका. यातून सामाजिक वाद निर्माण होतील आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कायदेशीर लढा लढता येतो. ओबीसी समाजाने कोणताही वाद करू नये,” असे बावनकुळे म्हणाले.

‘मराठ्यांच्या ताटातील ओबीसी नाही, ओबीसींच्या ताटातील मराठ्यांना द्यायचे नाही’ :

“मराठ्यांच्या ताटातील ओबीसी नाही आणि ओबीसींच्या ताटातील मराठ्यांना द्यायचं नाही. फडणवीस सरकार दोन्ही समाजाला न्याय देणार आहे,” असे बावनकुळे म्हणाले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही समाज आमनेसामने येणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले.

‘जरांगेंना पर्याय जनता शोधेल’ :

“मला जरांगेंबद्दल काही बोलायचं नाही, वाईट वागायचं नाही. याला जनता उत्तर शोधेल. सरकार म्हणून राज्य शांत ठेवणं आमची जबाबदारी आहे. ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजांसाठी सरकार काम करत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जरांगे आणि सरकारमधील आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच बावनकुळे यांच्या या भावनिक प्रतिक्रियेमुळे या वादाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT