Rajeev Kumar Sarkarnama
महाराष्ट्र

Election Commission on Rashmi Shukla : रश्मी शुक्लांबाबत काँग्रेसच्या 'त्या' मागणीवर अखेर निवडणूक आयोगाने स्पष्ट केली भूमिका!

Mayur Ratnaparkhe

New Delhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर आज जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकारपरिषद घेऊन संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेता येईल, अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

तसेच यावेळी राजीव कुमार यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या काही प्रश्नांचीही उत्तरं देत, निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट केली. या प्रश्नांमध्ये एक प्रश्न महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याबाबतचा होता.

महाराष्ट्राच्या पोलिस महासंचाकल रश्मी शुक्ला(Rashmi Shukla) यांना हटवण्याची काँग्रेसने मागणी केली होती. याबाबत आयोग काय विचार करत आहे आणि काय निर्णय होईल? या प्रश्नावर उत्तर देताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, कोणत्याही राज्याच्या महासंचालकांची निवड ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधून प्रशासकीय पद्धतीद्वारे केली जाते.

यूपीएससी अधिकाऱ्याची निवड करते. याचबरोबर प्रकाश सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची हाताळणी या विषयाचे नियमन करणाऱ्या कायदेशीर पद्धतीनुसार केली जाईल. हे नाव यूपीएससीने मंजूर केले आहे. पण तरी नेमकं काय आढळलं आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायायलयाने या प्रकरणात नेमके काय आदेश दिले आहेत, हे पाहून त्यानुसार हे प्रकरण हाताळले जाईल.

‘फोन टॅपिंग’चे आरोप झालेल्या रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलिस महासंचालकपदावरून तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयागोच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. विशेषतः काँग्रेस(Congress) पक्ष शुक्ला यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी आग्रही आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलिस महासंचालकपदावर राहिल्या तर त्या आपल्या पदाचा गैरवापर करतील, अशी तक्रार करून त्यांची इतर विभागात तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पक्ष यांनी ही मागणी केलेली आहे.

रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून तातडीने हटविण्यात यावे. तसेच, एकाच पोलिस ठाण्यात अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात यावी. कारण ते आपल्या पदाच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडू शकतात, असेही काँग्रेस नेत्यांनी म्हटलेले आहे.

दरम्यान, काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनीही पत्र लिहून रश्मी शुक्ला यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी केली होती.

तर या आधीही निवडणूक आयोगाने या प्रश्नाबाबत भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले होते की, महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची हाकलपट्टी करण्याची मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. ही तक्रार प्राप्त आहे. परंतु आम्ही वैयक्तिक मुद्यांवर आणि तक्रारींवर पत्रकार परिषदेत भाष्य करत नाही. "आम्हाला तक्रार मिळाली आहे, लेखी स्वरूपात मिळाली आहे. राज्यात अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. जेव्हा लागू होईल, तेव्हा निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. परंतु निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या वैयक्तिक तक्रारीवर काम करत नाही", असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT