Marathwada Flood : महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणाऱ्या मदतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या मॅन्युअलमध्ये 'ओला दुष्काळ' अशी कोणतीही टर्म नाही. यापूर्वी कधीही ओला दुष्काळ घोषित झालेला नाही. पण सध्याच्या स्थितीत दुष्काळी टंचाई पडली आहे असे समजूनच दुष्काळात देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू करण्यात येणार आहेत. मंगळवार (३० सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
फडणवीस म्हणाले, राज्यात ६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीचे २ हजार २१५ कोटी रुपयांचे वाटप सुरु आहे. E-KYC नियम शिथील करून अॅग्रिस्टॅकच्या नियमांप्रमाणे हे पैसे दिले जात आहेत. सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे २ ते ३ दिवसांमध्ये आमच्यापर्यंत पोहचतील. त्यानंतर शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान, खरडून गेलेली जमीन, घर, जनावरे यासाठीची मदत जाहीर करण्यात येईल. दिवाळीपर्यंत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात विशेषतः मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी व मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शेतकऱ्यांसाठी भरीव मदत आणि नुकसानभरपाई निकषांमध्ये बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. अतिवृष्टीच्या पाहणीसाठी मंत्रिमंडळाने केलेल्या जिल्हा दौऱ्यात अनेक मंत्री, आमदार व खासदारांना शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदतीचा निर्णय घेणार का, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते.
मुंबई व उपनगर वगळता संपूर्ण राज्य पावसाने तडाख्यात सापडले आहे. मराठवाड्यातील नद्यांना पूर आला असून आतापर्यंत ४० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मागील २ महिन्यांत तब्बल ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांच्या खरिपाच्या पिकावर पाणी फिरले आहे. खरीप हंगामातील जवळपास ६९ लाख हेक्टर क्षेत्र जमीनदोस्त झाले असून कापूस, सोयाबीन, तूर, मका, ऊस, भात, भाजीपाला, मूग, उडीद, कांदा, फळपिके, बाजरी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.