CM Eknath Shinde  
महाराष्ट्र

CM Eknath Shinde : महायुती विजयाची हॅट्‌ट्रिक करेल! मुख्यमंत्र्यांचा दहिसरच्या सभेत विश्‍वास

‘जनहितासाठी राबवलेल्या अनेक योजनांच्या आधारे शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस- रिपब्लिकन पक्षाचे महायुती सरकार विजयाची हॅट्‌ट्रिक करून तिसऱ्यांदा सरकार बनवेल

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ‘जनहितासाठी राबवलेल्या अनेक योजनांच्या आधारे शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस- रिपब्लिकन पक्षाचे महायुती सरकार विजयाची हॅट्‌ट्रिक करून तिसऱ्यांदा सरकार बनवेल,’ असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिसर येथील जाहीर सभेत रविवारी व्यक्त केला.

मागाठाण्याचे शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. शिंदे म्हणाले, ‘महायुतीप्रमाणेच येथील विद्यमान आमदार प्रकाश सुर्वेही विजयाची हॅट्‌ट्रिक करतील, याची खात्री आहे. प्रशासनाच्या यशस्वितेसाठी सरकारचा आणि लोकप्रतिनिधींचा लोकांशी थेट संपर्क आवश्यक आहे.

त्यामुळे सरकारमधील पक्षांच्या नेत्यांनी लोकांच्या समस्यांची दखल घ्यावी. त्यासाठी थेट बैठकांचे आयोजन करावे. आपण प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते असल्याने लोकांच्या समस्या ऐकून त्या सोडवल्याच पाहिजेत. याबाबतीत सुर्वे यांची कामगिरी उजवी आहे,’ असेही ते म्हणाले.

‘लाडकी बहीण योजना, औद्योगिकीकरणाचा वेग, तरुणांसाठी रोजगार, ज्येष्ठांना तसेच शेतकऱ्यांना सवलती, रस्तेबांधणी आदी योजनांमुळे सध्या राज्यातील वातावरण महायुतीच्या बाजूने झुकले आहे. त्यामुळे शनिवारी लागणारा निकाल हा आपल्याच बाजूने असेल. लाडकी बहीण योजना हा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम आहे; मात्र विरोधक यावर अनाठायी टीका करीत आहेत. या योजनेमुळे महिलांना घरात सन्मान मिळू लागला आहे,’ असेही ते म्हणाले.

मागाठाण्यात केलेल्या विकासकामांचे सर्व श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. त्यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिल्यानेच आपण गोरगरीब जनतेला, माता-भगिनींना आणि तरुणांना दिलासा देणाऱ्या योजना आणल्या, असे प्रकाश सुर्वे म्हणाले.

रात्री-अपरात्री केव्हाही संपर्क साधला तरी लगेच उपाय सांगणारे मुख्यमंत्री आपल्याला मिळाले आहेत. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी तिसऱ्यांदा तुमच्या सेवेसाठी येईन, अशी खात्रीही सुर्वे यांनी व्यक्त केली. या वेळी आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, भाजपचे गणेश खणकर, रिपब्लिकन पक्षाचे रमेश गायकवाड, माजी नगरसेविका गीता सिंघण, रिद्धी खुरसंगे, संध्या दोशी उपस्थित होत्या.

‘महाविकास’ची प्रकल्पांना खीळ

महाविकास आघाडीने आपल्या कारकिर्दीत मेट्रोसारख्या अनेक प्रकल्पांना खीळ घातली. तसेच, धार्मिक उत्सवांवरही निर्बंध घातले होते. त्यांच्या दोन वर्षांच्या कालावधीत काहीच भरीव काम झाले नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT