Maharashtra Political Controversy : संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणारा सध्याचा ताजा विषय म्हणजे टिपू सुलतान. मालेगाव महापालिकेपासून सुरू झालेला हा विषय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानानंतर महाराष्ट्रभर पसरलेला संघर्ष निश्चितच विचार करायला लावणारा आहे. जे सत्ताधारी भाजप अथवा त्यांचे सहकारी हा विषय ढवळून वाढवत आहेत, त्यांना खरोखरच छत्रपती शिवरायांशी टिपू सुलतान याची झालेली तुलना चुकीची वाटते? की या निमित्ताने हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून संपूर्ण काँग्रेसला बदनाम करण्याची व त्यांच्या विरोधात जनाधार निर्माण करण्याची ही राजकीय संधी वाटते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
वास्तविक पाहता हर्षवर्धन सपकाळ हे व्यक्तिमत्त्व वादापासून दूर राहणारे आहे. सुरुवातीपासूनच सर्वोदयवादी आणि गांधीवादी विचारांचा पगडा त्यांच्यावर आहे. बाबा आमटे यांच्या सामाजिक कार्याने प्रभावित होऊन त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासींसाठी वेळोवेळी प्रशासनाबरोबर संवाद साधून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. राजकीय वक्तव्य आणि डावपेच यापेक्षा त्यांचा सामाजिक कल अधिक असल्याचे नेहमीच अधोरेखित होते. अशा व्यक्तीकडून छत्रपती शिवरायांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी कशी होऊ शकते, हा सर्वसामान्यांना पडला आहे.
सपकाळ यांचे म्हणणे आहे की, ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी स्वराज्य मिळविण्याच्या दृष्टीने मुघलांशी संघर्ष केला त्याच पद्धतीने टिपू सुलतान यांनी इंग्रजांशी संघर्ष करून आपले साम्राज्य वाचविण्याचा प्रयत्न केला, ही बाब त्यांच्या योद्धेपणापुरतीच मर्यादित होती. मात्र, चुकीचा अर्थ लावणाऱ्यांनी सरळ सरळ मी छत्रपती शिवरायांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केली असा लावला. खरंतर छत्रपती शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. ते अद्वितीय योद्धे आहेत. याबद्दल दुमत नाही. परंतु, आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी व शांत असलेल्या महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र रचले जात आहे का? असा सवाल आहे.
सर्वसामान्यांचे प्रश्न जसे कर्जमाफी, हमीभाव, रखडलेली विकासकामे यावरून लोकांचे लक्ष विचलित करून जाती-जातीमध्ये आणि धर्मा-धर्मांमध्ये तेढ निर्माण करून त्यांना आपसात लढवत ठेवण्याची नीती असल्याचा वास येत आहे. यावर भाजपच्या स्थानिक नेत्यांची किंवा सत्तेतील लोकप्रतिनिधींची भूमिका अशी आहे, की सपकाळ यांनी छत्रपतींची कुणाशीही तुलना करणे योग्य नाही. छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतान यांची वर्तणूक आणि विचारधारेत मोठ्या प्रमाणावर विषमता होती. त्यामुळे सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी.
मुळात महापुरुष हे कोणत्याही जाती-धर्माचे नसतात. त्यांनी केलेल्या कार्याच्या बळावर त्यांना समाजाने ही पदवी बहाल केलेली असते. त्यांच्या नावाने कुणी राजकारण करू नये. महापुरुषांबद्दल सन्मान असणे याचा अर्थ इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल द्वेषाची किंवा कमीपणाची भावना बाळगणे सर्वथा चुकीचे आहे.
सपकाळ यांचे वक्तव्य चुकीचे आहे की, सत्ताधाऱ्यांची भूमिका बरोबर नाही हे प्रश्न वेगळे आहेत. सपकाळ यांनी अनावधानाने का होईना, अशी तुलना केली असेल तर ती चुकीचीच आहे. तरी या नावाखाली राज्यभरातील शांत वातावरण अशांत करणे, काँग्रेसच्या कार्यालयांवर हल्ले करणे, हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापणाऱ्याला बक्षीस जाहीर करणे, शिवराळ भाषेत एकमेकांवर टीका करणे, पक्षापक्षांमध्ये असो की जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून ज्या व्यक्तिमत्त्वांच्या नावाने आपण हे सर्व करीत आहोत त्यांना तरी हे पटेल का? हा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.