Mumbai News : नागपुरातील पाचपावली परिसरातील बाळाभाऊपेठीतील एका घरात 'एमडी' ड्रग्ज बनविण्याची प्रयोगशाळा पोलिसांनी सील केली. या प्रयोगशाळेत एमडी ड्रग्स निर्माण केला जायचे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर होम ग्राऊंडवर हा गुन्हा उघडकीस आल्याने त्यावरून काँग्रेसने निशाणा साधत जहरी टीका केली आहे.
काँग्रेसने 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर करत देवेंद्र फडणवीस यांनना टार्गेट केले. 'नागपूर झाले 'ड्रग्स'पूर', असे मथळ्याखाली 'मी पुन्हा येईन! मी पुन्हा येईन! आणि नागपूरला ड्रग्सपूर करीन!!' असा टोमणा सुरवातीला काँग्रेसने लगावला आहे. फडणवीस यांना काँग्रेसने त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली आहे. देवेंद्र फडणवीस कदाचित गृहमंत्री पदाचे अधिकार आणि कर्तव पक्षफोडीच्या राजकारणात विसरलेले दिसत आहेत. अथवा महाराष्ट्राला ड्रग्सच्या विळख्यात घालून तरुण पिढीला आणि महाराष्ट्राला पूर्णपणे बरबाद करण्याचं भाजपचं घाणेरडं राजकारण सुरू आहे, असा घाणाघात काँग्रेसने केला आहे.
भाजप नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या गृहमंत्री पदाचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे नाव 'फसनवीस' करून घ्यावं, असा जहरी टीका काँग्रेसने केली आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निमित गोयल, पाचपावलीचे ठाणेदार बाबुराव राऊत आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), कस्टम विभाग नागपूरचे प्रमुख गौरव मेश्राम यांच्या पथकाने नागपुरातील पाचपावली परिसरातील बाळाभाऊपेठी या ड्रग्जच्या प्रयोगशाळेवर कारवाई केली. ही कारवाई करत प्रयोगशाळेतून 78 कोटींचे रसायन, साहित्य जप्त केले. तसंच आकाश हारोडे, साहिल शेख, सुमित घोरमाडे आणि दिव्यांशू चक्रपाणी, हे युवक ही प्रयोगशाळा चालवायचे. या चारही युवकांना 14 ऑगस्टपर्यंत डीआरआय कोठडी मिळली आहे.
ही चारही युवक शिक्षण घेत आहेत. ड्रग्ज बनवण्यासाठी त्यांनी रसायन कोठून घेतले? प्रयोगशाळेतील साहित्य कसे मिळवले? प्रयोगशाळा उभारणीसाठी पैसे कोणी दिले? तसंच प्रयोगशाळेत निर्माण केले जाणारे ड्रग्ज कोठे आणि कसे वितरीत व्हायचे? याची माहिती पोलिस आता घेत आहे. चार दिवसापूर्वीच हा कारखाना सुरू झाला होता. या गुन्ह्यातील आकाश हारोडे यांचे एका युवतीशी प्रेमसंबंध होते. या युवतीला झटपट श्रीमंत व्हायचे होते. त्यासाठी ड्रग्ज निर्मितीची कल्पना पुढे आणि प्रेयसीने तिचे घर ड्रग्ज निर्मितीच्या प्रयोगशाळेसाठी भाड्याने दिले. या कारवाईमुळे नागरपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.