Akola Loksabha Election 2024 : अकोल्यात वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसने काडीमोड करत थेट डाॅ. अभय पाटील यांना तिकीट घोषित केले. पूर्वाश्रमीचे संघ स्वयंसेवक, विश्वहिंदू परिषदेचे कट्टर कार्यकर्ते अशी ओळख असलेले डाॅ. अभय पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांच्या सोबतदेखील तितकेच घट्ट नाते आहे. वंचितने महाराष्ट्रात सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केली. पण, काँग्रेसने मात्र वंचितला अकोल्यात साथ दिली नाही. अखेर आज अकोल्यातून वंचित विरोधात काँग्रेसने मुस्लिम उमेदवार न देता मराठा उमेदवार दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे काम डाॅ. अभय पाटील यांनी जोमाने केले होते. त्यामुळे अकोल्याची तिरंगी लढत देशात चांगलीच गाजणारी ठरणार आहे. अस्थिरोग तज्ज्ञ असलेले डाॅ. अभय पाटील यांच्या तिकिटाची घोषणा होताच अकोल्यात सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. अकोल्यातील भाजप नेते मात्र आता अस्वस्थ असून, संघ परिवार कुठे जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर अकोल्यातून कुठल्याही परिस्थितीत मुस्लिमांची मते फोडण्यासाठी एमआयएमला आणण्याचा डाव रचला जात आहे. यासाठी महायुतीच्या काही नेत्यांनी पायघड्या घालणे सुरू केल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात वंचितला काँग्रेसने जोरदार धक्का दिला आहे. यंदा मराठा उमेदवार देत काँग्रेस ने भाजपलादेखील चकित केले आहे. 2019 मध्ये डाॅ. अभय पाटील यांचे शासकीय प्रमाणपत्र निवडणुकीच्या वेळी दडवून ठेवण्यात भाजपला यश आले होते. यंदा मात्र तशी परिस्थिती नव्हती. डाॅ. अभय पाटील हे दमदार उमेदवार असून, त्यांच्यामुळे भाजप नेत्यांना चांगलाच घाम फुटणार आहे. गेल्या निवडणुकीत आंबेडकर दुसऱ्या स्थानी होते यंदा आंबेडकर दुसऱ्या स्थानी राहतात की तिसऱ्या असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.
अकोल्यात काँग्रेसने उमेदवार दिल्याने राज्यात महाविकास आघाडीच्या विरोधात आता आंबेडकर वंचितचे उमेदवार उभे करतील. तसेच राज्यात कोल्हापूर आणि नागपूर येथे वंचितने काँग्रेस उमेदवाराला दिलेला पाठिंबा आता कायम राहतो काय हे पाहण्यासारखे ठरेल. त्याच बरोबर वंचित महाविकास आघाडीच्या विरोधात राज्यात उमेदवार उभे करणार असेल, तर त्याचा निश्चितच फायदा 2019 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजपला अर्थात आता महायुतीला होण्याची चिन्हं आहे. त्यामुळे वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर पुन्हा एकदा ते भाजपची बी टीम आहे हा आरोप जोरदार चर्चेत राहील. त्यामुळे पुढील काळात आंबेडकर महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवार उभे करतात काय हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
डाॅ.अभय पाटील यांची अतिशय दमदार दावेदारी ही अकोल्यातील निवडणुकीत मात्र जोरदार चुरस निर्माण करणारी ठरणार आहे. भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्याबद्दल संघ वर्तुळात उघडपणे घराणेशाहीचा आरोप होणे आणि विश्वहिंदू परिषदेचे एकेकाळचे कट्टर समर्थक डाॅ. अभय पाटील यांना तिकीट मिळणे हे चित्र भाजप उमेदवारासाठी चिंताजनक आहे. त्याच बरोबर भाजपचे माजी ज्येष्ठ आमदार नारायण गव्हाणकर यांनी अकोल्यात अपक्ष लढण्याची सुरू केलेली तयारी ही भाजपला अडचणीची ठरणार आहे. भाजपने अकोल्यात 19 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये नाना पटोले यांच्या वाक्याप्रमाणे ठरवित काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मताला काँग्रेसने किंमत दिली नाही. मुलीचे तिकीट कापल्यानंतर वडेट्टीवार यांना त्याचा अंदाज का आला नाही हा प्रश्नच आहे, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समापनप्रसंगी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती आणि काँग्रेस दिग्गज नेत्यांसोबतची मैत्री अकोल्यासाठी उपयोगी ठरली नाही. अखेर अकोल्यात काँग्रेस नेते डाॅ. अभय पाटील यांना उमेदवारी घोषित झाली. यामुळे अकोल्यात भाजपची डोकेदुखी वाढली तर राज्यातील भाजप नेते सुखावले आहे. अकोल्यात नाना पटोले 4 एप्रिल रोजी वंचितविषयी काय गौप्यस्फोट करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.