Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी(दि.१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी त्यांची भेट घेतली. या दोन्ही भेटींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना जोरदार उधाण आले आहे. मात्र, यावर राजकीय वर्तुळातुन प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या भेटीवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले(Nana Patole) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगपती गौतम अदानी यांच्या भेटीवर भाष्य केलं. पटोले म्हणाले, शरद पवार यांचा वेगळा पक्ष आहे. ते काँग्रेस पक्षाचे नाही. त्यांचा पक्ष वेगळा आहे.आम्ही भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. कुणाला जबरदस्ती तर करता येत नाही. ते कुणाला भेटतात, त्यांचं मत काय कुठल्या विचारांचं समर्थन करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. अदानी उद्या पवारांच्या घरी राहायला गेले तरी त्यांचं काय..? अशी खोचक टोला पटोलेंनी लगावला आहे.
अदानींना आमचा कोणताही वैयक्तिक विरोध नाही. तर ज्या पध्दतीने देश विकून त्यांना दिला जातोय. त्यांसंबधींचे प्रश्न उपस्थित आम्ही करत आहोत. देशातील जनतेचे पैसे अदानींना दिले जात आहे. हा काँग्रेसचा आरोप आहे. त्यामुळे कुणाच्या भेटीवर आमचं काहीही म्हणणं नाही असंही पटोले म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले..?
शरद पवार(Sharad Pawar) आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर राज्याचे विरोथधी पक्षनेते अजित पवारांनी रोखठोक भाष्य केलं. पवार म्हणाले, भेट झाली म्हणजे काय झालं? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला काही महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी पंतप्रधानांचीही भेट घ्यावी लागली होती. तेव्हा तेही भेटले होते. अदानी अनेकवेळा शरद पवारांची भेट घेत असतात. त्यांची ओळख आहे. त्यांची काही अडचण असेल, प्रश्न असतील, काही गोष्टी मांडायच्या असतील. त्यासाठी ते भेटले असावेत असंही अजित पवार(Ajit Pawar)ही म्हणाले.
कदाचित मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीने दिलेल्या निकालाबाबत काही बोलायचं असेल. मला माहिती नाही. पण वेगवेगळे उद्योगपती वेगवेगळी गुंतवणूक वेगवेगळ्या राज्यांत करत असतात. जरी हिंडेनबर्गचा मुद्दा निघाला असला, तरी अनेक राज्यांत त्यांची गुंतवणूक सुरु आहे. ते कशासाठी भेटले हे काही मला माहिती नाही असंही पवार म्हणाले.
पवार-अदानी भेटीमुळे राजकीय चर्चाना उधाण...
शरद पवार आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहचल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी हे त्यांची भेट घेण्यासाठी आले. अदानी यांच्यावर हिंडेन्बर्ग या परदेशी संस्थेने केलेल्या आरोपानंतर राजकीय क्षेत्रात आरोपांची राळ उडवली गेली होती. संसदेत थेट पंतप्रधान मोदी यांना यावरून विरोधकांनी लक्ष्य केले होते. पंतप्रधान वा भाजपमधील कुणीही अदानी यांची थेट बाजू घेतली नव्हती. मात्र, पवार यांनी एखाद्या परदेशी संस्थेने असे आरोप करण्याबाबत साशंकता व्यक्त केली होती.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.