pooja khedkar sarkarnama
महाराष्ट्र

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ, थेट दिल्लीतून होणार कारवाई

Pooja Khedkar Action will be taken from Delhi : यूपीएससीची परीक्षा देताना पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड आणि मेंटल इलनेस असल्याची सर्टिफिकेट सादर केले होते. त्याआधारे त्यांनी परीक्षा देत विशेष सवलत मिळवून आयएएस बनल्याचे समोर आले आहे.

Chaitanya Machale

Pune News : मागील वर्षी पुण्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या आयएएस (सनदी) अधिकारी डॉ. पूजा खेडेकर यांचे पाय आता आणखी खोलात गेले आहेत. डॉ. पूजा या नक्की आयएएस कशा झाल्या? त्यांनी अपंगत्वाची सादर केलेली कागदपत्रे खरी आहेत का? याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

यूपीएससीची परीक्षा देताना पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड आणि मेंटल इलनेस असल्याची सर्टिफिकेट सादर केले होते. त्याआधारे त्यांनी परीक्षा देत विशेष सवलत मिळवून आयएएस बनल्याचे समोर आले आहे. त्यांना ही सवलत मिळाली नसती तर त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे त्यांना आयएएस दर्जा मिळणे अशक्य होते. सरकारने याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता थेट दिल्लीत या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मागील वर्षी आयएएस झालेल्या डॉ. पूजा खेडकर यांची प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात काम करताना मोठ्या आणि अद्यावत केबिनसाठी त्यांनी हट्ट धरला. वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या अँटीचेंबरचा ताबा घेत त्यांना त्रास देण्यास त्यांनी सुरुवात केली.

इतकेच नव्हे तर आपल्याकडे असलेल्या व्हीआयपी नंबर प्लेट असलेल्या खाजगी गाडी ऑडीला अंबर दिवा लावून त्या सर्वत्र मिरवत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा त्रास वाढतच असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांच्या कामाचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला होता.

या अहवालामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून पुण्यात आलेल्या डॉ. खेडकर यांना पुण्या ऐवजी इतर ठिकाणी प्रशिक्षणाच्या कालावधीत कामासाठी पाठवावे, अशी विनंती वजा मागणी जिल्हाधिकारी दिवसे यांनी केली होती. प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतानाच डॉ. खेडेकर यांच्याकडून सुरू असलेल्या प्रकारच्या बातम्याही प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केलेल्या विनंतीची दखल घेत राज्य सरकारने पूजा खेडेकर यांची बदली वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून केली आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून काम करणाऱ्या पूजा खेडेकर यांच्या बाबत अनेक तक्रारी देखील आता येण्यास सुरुवात झाली आहे. लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन यांनी डॉ. पूजा खेडकर यांच्या वादग्रस्त ओबीसी जात प्रमाणपत्र प्रकरणाबाबत कारवाई सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच कॅटने त्यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर देखील डॉ. पूजा खेडेकर यांनी एम्स रुग्णालयात चक्क सहा वेळा वैद्यकीय चाचणी देण्यास नकार दिल्याची देखील चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे याबाबतचा अहवाल देखील आता मागविला जाणार आहे. या सर्व प्रकारांमुळे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉ. पूजा खेडेकर यांचे पाय अधिकच खोलात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कारवाई होणार?

डॉ. पूजा खेडकर या सध्या प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम करत आहेत. त्यांचा प्रोबेशन पूर्ण होईपर्यंत त्या राज्य सरकारच्या पूर्णवेळ कर्मचारी नाहीत. अशा वेळी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी अशा प्रकरणांची दखल घेते आणि त्यामध्ये माहिती मागवते. यामध्ये खेडकर यांना या प्रकरणी त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. त्यामध्ये त्या यूपीएससीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत सर्व निकष पूर्ण करत आहेत की नाही याची पुन्हा संपूर्ण पडताळणी केली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती एका माजी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने दिली.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT