Mumbai News, 17 Dec : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घवघवीत यशात मोलाचा वाटा असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारकडून हिवाळी अधिवेशनात 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना डिंसेंबर महिन्याचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
नागपूर (Nagpur) येथे सरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जवळपास 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या चालू असलेल्या विविध योजनांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधानसभेत या पुरवणी मागण्या मांडल्या. यामध्ये बहुचर्चित अशा लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच राज्यभरातील लाडक्या बहिणींना त्यांचा रखडलेला हप्ता मिळणार आहे.
सामंत यांनी विधानसभेत मांडलेल्या पुरवणीमध्ये महिला व बाल विकास विभागासाठी 2,155 कोटींची तरतूद करण्यात आली. यापैकी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत 2.34 कोटी लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत 7,500 कोटी यापूर्वी देण्यात आले आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे आता येणारा हप्ता 1500 रुपये असणार की 2100 हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिवाय हिवाळी अधिवेशानात पुरवणी मागण्यांत तरतूद रक्कम ही लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी वापरली जाणार आहे.
त्यामुळे नवीन वर्षाच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेसह, मुंबईतील मेट्रो प्रकल्पांकरिता 1 हजार 212 कोटी, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3 हजार 150 कोटी तसंच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूदही या पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.