Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : लादलेल्या उपमुख्यमंत्रिपदापासून अखेर फडणवीस लांब राहणार?

Rajanand More

Mumbai : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या खांद्यावर घेत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनाम देण्याची तयारी केली आहे. खरंतर उपमुख्यमंत्रिपद त्यांच्यावर दोन वर्षांपुर्वी लादण्यात आलं होतं. मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेल्या फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद नको होतं. पण पक्षनेतृत्वाच्या आग्रहामुळे त्यांना हे पद स्वीकारावं लागलं होतं. 

पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून मोकळं करण्याची विनंती पक्षनेतृत्वाला करणार असल्याचे विधान फडणवीसांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केलं. सरकारमध्ये फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह गृह हे महत्वाचं खातं आहे. दोन वर्षांपुर्वी घडलेल्या नाटकीय घडामोडींनंतर फडणवीसांना हे पद मिळालं होतं.

काय घडलं होतं?

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर 20 जून 2022 ला उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपनं ‘मी पुन्हा येईन’चा व्हिडिओ ट्विट केला. पण त्यानंतर भलतंच घडलं. एकनाथ शिंदे गुवाहाटीत मुंबईत आल्यानंतर फडणवीसांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी शिंदे पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. तसेच आपण सत्तेच्या बाहेर राहणार असल्याचं जाहीर केलं होतं.

साडेसात वाजता शपथविधी होणार असल्याने तशी तयारी सुरू असतानाच भाजपचे अध्यक्ष जे. पी  नड्डा अचानक टीव्हीवर अवतरले. फडणवीसांना उपमुख्यमंत्री करण्याचा पक्षाचा आदेश असल्याचे नड्डा यांनी जाहीर केले. त्यांनी याबाबत ट्विटही केले. गृहमंत्री अमित शाहांनी त्याला लगेच दुजोराही दिला. पण फडणवीस त्यासाठी तयार नव्हते. अखेर नेतृत्वाच्या आग्रहानंतर त्यांनी शपथ घेतली.

मी पुन्हा येईल म्हणणाऱ्या फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागल्याने अवघा महाराष्ट्र अचंबित झाला. मात्र, त्यानंतर फडणवीसांनी पुढे होत सरकार चालवण्यास सुरूवात केली. त्यानंतर राष्ट्रवादी फोडत त्यांनी अजित पवारांनाही सोबत घेतले. तिघे सोबत असतानाही लोकसभेत पराभव झाल्याने फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा होणेही महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मानले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT