pankaja munde-Dhananjay munde
pankaja munde-Dhananjay munde Sarkarnama
महाराष्ट्र

त्यावेळी तुम्ही तुमचं मंत्रीपद कुणाला भाड्यानं दिलं होतं : धनंजय मुंडेंचा पंकजांना सडेतोड सवाल

सरकारनामा ब्यूरो

परळी : दसरा मेळाव्यातील भाषणात त्यांनी कबूल केले आहे की, त्यांना आपल्या पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात ऊसतोड मजुरांना न्याय देता आला नाही. मग, त्यावेळी त्यांनी त्यांचं मंत्रिपद कुणाला भाड्याने दिले होते, असा जळजळीत सवाल करत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या टीकेला सडतोड उत्तर दिले. (Dhananjay Munde's unequivocal answer to Pankaja Munde's criticism)

पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी आपले मंत्रीपद भाड्याने दिलं आहे, असा आरोप केला होता. त्याला धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. भाजप सरकारच्या पाच वर्षे मंत्री असतानाही त्यांना राज्यातील विशेषतः बीड जिल्ह्यातील ऊसतोड मुजरांना न्याय देता आला नाही. पाच वर्षे मंत्री आणि बीडचे पालकमंत्री राहिलेल्या व्यक्तीने असे आरोप करणे, हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा टोलाही त्यांनी पंकजांना लगावला.

पाचशे लोक वस्तीच्या ठिकाणी संविधान भवन बांधण्यात येईल. या वर्षीपासून हे काम हातात घेण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी, गोदावरी खोऱ्यातील पाणी वापर वाढविण्याबात घेतलेल्या निर्णयाचा फायदा बीड, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकरने दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. ती मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, त्याची आम्ही दक्षता घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करून परळीत जोरदार स्वागत करण्यात आले होते. त्यावर टीका करताना पंकजा म्हणाल्या होत्या की, आम्ही भगवान गडावर पुष्पवृष्टी केली. आम्ही कोणाचीही चमचेगिरी केली नाही. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर धनंजय मुंडे म्हणाले की, आपल्या पक्षाचे नेते आपल्यात गावात आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्याची मला सवय आहे. आपला पक्ष, आपल्या नेत्यांमुळे आपण इथपर्यंत आलो, याची जाणीव असावी असते. ती मला असल्यामुळे त्या जाणीवेतूनच आमच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागत केले. ते मी नाही, तर परळीच्या जनतेने उत्स्फूर्तपणे केले होते.

असामाजिक न्याय विभाग त्यांच्याकडे आला आहे, अशी टीका पंकजा यांनी केली होती. त्याला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, सामाजिक न्याय हा सामाजिक न्याय आहे. तो अ, ब, क असा काही नसतो. त्या परळीत विधानसभेला पराभूत झाल्या, त्यावेळी त्यांना काय म्हणावं. त्यांच्या मनासारखं झालं नाही की, त्या असं काही बाही बोलतात.

विरोधी पक्षाने हे सरकार पडेल, याची वाट पाहू नये आणि सरकारने आपले काम करावे, असे पंकजांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. त्यावर त्या नेमक्या कुठं आहेत, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. तुमचे लोक परळीत काय करताहेत, हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकदा येऊन पाहावे, असे त्यांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना, ‘परळीच्या जनतेने विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांना दाखवून दिले आहे,’ असा टोला धनंजय यांनी पंकजांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT