Eknath Khadse Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Khadse On Exit Poll Result: एकनाथ खडसे खवळले, 'एक्झिट पोल'वरून कोणाला सुनावले?

Jagdish Patil

Lok Sabha Election 2024 Exit Poll: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर एक्झिट पोलच्या आकड्यांनी धमाल उडवून दिली आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याच नावावर मोहर उमटली असली तरी महाराष्ट्रातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपला जोर का झटका बसणार असल्याचं दिसत आहेत. एक्झिट पोलमध्ये भाजपचा आकडा 17 दाखवला असल्यामुळे भाजपचे काही नेते आतापासून चिंतनाच्या मूडमध्ये आहेत.

दुसरीकडे ठाकरे आणि पवारांच्या पक्षात मात्र आनंदच आनंद पाहायला मिळत आहे. अशातच पुन्हा एकदा 'घरवापसी' करण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसे (Ekanth Khadse) यांनी भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला सुनावले आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे ही वेळ ओढावल्याचे सांगून खडसेंनी राज्यातील फोडाफोडीचे 'बादशहा' ठरलेल्या देवेंद्र फडणवीसांवरच अप्रत्यक्षरित्या आपला रोख ठेवल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काल बहुप्रतिक्षित असलेले लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले. या पोलमुळे देशातील जनतेचा मूड काय आहे हे बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. शिवाय देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच येणार असल्याचा अंदाजदेखील या पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलवरुन आता विविध पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

याच पोलच्या निकालावर भाष्य करताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजपच्या नेतृत्वावर अप्रत्यक्षरित्या टीका केली. खडसे म्हणाले, एक्झिट पोलचा निकाल पाहता भाजपला 350 च्या वर जागा मिळतील अशी चिन्हे आहेत. मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही विकासकामे केली आहेत, ती पाहून जनतेने त्यांना पुन्हा एकदा पाठिंबा दिला आहे. देशात एनडीए 400 पार होईल अशी आपल्याला अपेक्षा नव्हती. मात्र 350 पार होईल हा विश्वास होता. पोलचा निकाल पाहता हा विश्वास सत्यात उतरेल अशी चिन्हं आहेत.

फोडाफोडीचे राजकारण रुचलेलं नाही

देशात मोदींना जनतेचा पाठिंबा असला तरी राज्यात मात्र फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसं रुचलेलं नाही. त्यामुळेच काही जागा कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचंही खडसे म्हणाले. त्यामुळे खडसेंनी नेमका कोणाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT