Dombivli News : डोंबिवलीतील बहिणाबाई उद्यानाच्या परिसरात वाचनालय उभारणीच्या कामावरुन शिवसेना ठाकरे गटाने - शिंदे गटाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता भाजपची देखील शिवसेना शिंदे गटाविरोधात असलेली नाराजी उघड झाली आहे. भाजपचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांची समाज माध्यमावरील ही नाराजीची पोस्ट व्हायरल होत आहे. 'मतलबी आणि स्वार्थी मित्रपक्षाचा जाहीर निषेध करतो', असे उघड उघड त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटल्याने डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गट (Eknath shinde Shivsena) आणि भाजपमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर हे नाराजीनाट्य रंगताना दिसत आहे. (Dispute between Shinde faction of Shiv Sena and BJP over library construction)
कल्याण लोकसभा मतदारसंघात मित्रपक्ष असलेल्या भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटात सारे काही आलबेल नाही. लोकसभा निवडणूक काळात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करत होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांना येथील उमेदवारी मिळणार का? याविषयी सांशकता निर्माण झाली होती. भाजपाने त्यावेळी असहकाराचा ठराव देखील केला होता. यावरुन शिंदे गट आणि भाजपामधील वाद उफाळून आला होता.
विधानसभा निवडणूकीत कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश पाटील यांच्यात जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणावरून हा वाद पुन्हा पेटला होता. वरिष्ठ पातळीवर पक्षातील बडे नेते सारे काही सुरळीत सुरू असल्याचे भासवण्यात आले. तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही मित्रपक्षांत वादाचे प्रसंग उद्भवताना दिसत आहे. आता आगामी महापालिका निवडणूकीच्या तोंडावर सर्व पक्ष सक्रीय झाल्याचे पहायला मिळत आहेत. कामाच्या श्रेयवादावरून राजकीय पक्षांत कलगीतुरा रंगताना दिसत आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरुन ठाकरे गट आणि मनसेने कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. पलावा उड्डाणपूलाचे रखडलेले काम यातून त्यांची एकजूट दिसून आली आहे.
डोंबिवलीतील कवयित्री बहिणाबाई उद्यानाच्या परिसरात वाचनालयाची उभारणी करण्यात आली आहे. या कामाची सुरुवात झाल्यानंतर या कामास शिवसेना ठाकरे गटाने उद्यानाच्या जागेत वाचनालयाची उभारणी करण्यात येऊ नये असे म्हणत या कामाला विरोध दर्शविला होता. या वाचनालयाची उभारणी झाली असून आता भाजपचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी येथील नामफलकावरुन शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची समाज माध्यमावरील नाराजीची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वाचनालयावरील नामफलकाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करत त्यांनी पोस्टमध्ये भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी पहावे आणि विचार करावा असे म्हणत महायुतीचा धर्म जसे आपण पाळतो तसे मित्रपक्ष युती धर्म निभावतात का? असा सवाल त्यांनी केला आहे. सुनीलनगर हा भाजपचे माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे व माजी नगरसेविका अलका म्हात्रे यांचा असून या फलकावर कोठेही त्यांचे फोटो लावण्यात आलेले नाहीत.
माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या पत्नी व माजी नगरसेविका रंजना पाटील व माजी नगरसेवक रवी पाटील यांचा या प्रभागाशी काही संबंध नसताना त्यांचे फोटो का लावण्यात आलेले आहेत असा सवाल त्यांनी करत मतलबी आणि स्वार्थी मित्रपक्षाचा जाहीर निषेध करतो असे पोस्टद्वारे म्हटले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रीया आलेली नसून शिंदे गट याला कसे उत्तर देतो हे पहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.