Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 23 जिल्ह्यांमध्ये 11 संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. या 11 मंत्र्यांकडे त्या-त्या जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटनेची आणि पक्ष वाढीची जबाबदारी असणार आहे. या निर्णयातील राजकीय मेख अशी की या 23 जिल्ह्यांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री आहेत. यातून पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्येही संघटनेच्या माध्यमातून लक्ष ठेवता येणार आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपनेही अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री असलेल्या 17 जिल्ह्यात संपर्क मंत्र्यांची नेमणूक करीत खेळी केली होती. त्यामुळे शिंदे यांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेत भाजपच्या पावलावर पाऊल टाकले आहे. पण या नियुक्त्या करताना एकनाथ शिंदे यांनी सेफ गेम खेळल्याचे दिसून येत आहे. त्यांनी वादग्रस्त रायगड आणि नाशिकमध्ये संपर्क मंत्र्यांची नियुक्तीच केलेली नाही.
- गुलाबराव पाटील- परभणी, बुलडाणा
- उदय सामंत- मुंबई उपनगर, पुणे, सिंधुदुर्ग
- शंभुराजे देसाई- सांगली, आहिल्यानगर
- संजय राठोड- नागपूर, चंद्रपूर, अमरावती
- दादाजी भुसे- धुळे, नंदूरबार
- प्रताप सरनाईक- पालघर, सोलापूर
- भरतशेठ गोगावले- हिंगोली, वाशिम
- संजय शिरसाट- नांदेड, बीड
- प्रकाश आबीटकर- अकोला, लातूर
- आशिष जैस्वाल- भंडारा, गोंदिया
- योगेश कदम- जालना
यातून रायगड आणि नाशिक हे जिल्हे वगळण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्येही संपर्क मंत्री नियुक्ती केली असती तर शिंदे यांनी इथे आपले पालक मंत्री होणार नाहीत, असा मेसेज जाण्याची शक्यता होती. हीच शक्यता ओळखून आपला या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरील क्लेम शिंदे यांनी कायम ठेवला आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
रायगड जिल्ह्यात एकूण सात आमदार आहेत. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, शिवसेनेचे ती आणि भाजपचे तीन आमदार आहेत. त्याच जोरावर रायगडचे पालकमंत्री आपणच होणार असे भरतशेठ गोगावले अगदी ठासून सांगत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला तसा शब्द दिला आहे, असेही त्यांनी सांगितले होते. पण जेव्हा पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली त्यावेळी गोगावले यांचा पत्ता कट झाल्याचे दिसले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जिल्ह्यात एकच आमदार असलेल्या पक्षाला म्हणजे अदिती तटकरे यांना देण्यात आले.
इथेच नाराजीची पहिली ठिणगी पडली. एकतर गोगावले यांना मागच्या सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे आता मंत्रीपद मिळाले आहे तर पालकमंत्री आपल्यालाच मिळाले पाहिजे, असा त्यांचा दावा सुरुवातीपासून होता. पण त्यांना डावलून त्यांच्यापेक्षा वयाने अगदी कमी असलेल्या अदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्याने त्यांचा पारा चढला. त्याचवेळी शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी तर आपला राजकीय अस्त झाला तरी चालेल पण तटकरेंना सहन करणार नाही, अशी ठाम भूमिकाच घेतली.
नाशिकमध्येही अशीच पालकमंत्रीपदावरून नाराजी उफाळून आली. नाशिकमध्ये एकूण आमदार आहेत १५. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन आणि एमआयएमचा १ आमदार आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दादा भुसे यांनी सुरुवातीपासूनच फिल्डिंग लावली होती. त्यांच्या जोडीला सर्वाधिक आमदार असलेल्या राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांनीही पालकमंत्रीची पदाची स्वप्न बघितली होती. यातही भुसे किंवा कोकाटे यांचीच वर्णी लागू शकते हे जवळपास फिक्स मानले जात होते.
पण झाले वेगळेच. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा भाजपच्या गिरीष महाजन यांच्याकडे देण्यात आली. गिरीष महाजन हे जळगावमधील जामनेरचे आमदार आहेत. पण त्यांना नाशिकचे पालकमंत्रीपद देण्यात आले. नाशिकमधील आगामी कुंभमेळा, त्यासाठीची तयारी आणि करोडो रुपयांचे बजेट यामुळे यंदा इथल्या पालकमंत्रीपदाला नेहमीपेक्षा अधिक महत्व प्राप्त झाले होते. इथेच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार कमालीचे नाराज झाले. त्यानंतर या दोन्ही पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.