Mumbai Political News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील टोल नाक्यांच्या मुद्द्यारून शिवसेना-भाजप युतीने त्यांच्या जाहीरनाम्यात केलेल्या टोलमुक्त महाराष्ट्रची आठवण करून दिली. (Toll Free Maharashtra News) यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांना टोलमधून मुक्ती देत आपण युती सरकारने दिलेला शब्द पाळल्याचा दावा केला.
यावर फडणवीसांनी दिलेल्या प्रतिक्रियेच्या व्हिडिओवर मनसेने (MNS) खोचक टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी `भाजपकुमार थापाडे`, असा उल्लेख करत उडवलेल्या खिल्लीची आठवण या निमित्ताने मनसैनिकांना झाली. मनसेने आपल्या अधिकृत `एक्स` पेजवरून केलेल्या पोस्टची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे.
ठाण्यातील पाच टोल नाक्यांवरील शुल्कवाढीच्या निषेधार्थ मनसेच्या अविनाश जाधव यांनी आपल्या सहाकाऱ्यांसह उपोषण सुरू केले. (Devendra Fadnavis) यावर राज ठाकरे यांनीही टोलमुक्तीच्या केलेल्या घोषणेवरून तत्कालीन शिवसेना-भाजप युतीने कसे घूमजाव केले हे पत्रकारांना सांगितले. याचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी केलेल्या टोलमुक्तीच्या घोषणेबद्दल माध्यमांनी बोलते केले.
यावर फडणवीसांनी आपण जाहीरनाम्यात दिलेले वचन कसे पूर्ण केले हे सांगताना राज्यातील सर्वच दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांना टोलमधून सूट दिल्याचे सांगितले. हा व्हिडिओ जेव्हा समाजमाध्यमांवर आला, तेव्हा मनसेने त्यावर खोचक टीका केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचा `भाजपकुमार थापाडे` असा उल्लेख केला होता.
त्याचा संदर्भ देत केलेल्या पोस्टमध्ये मनसेने म्हटले आहे की, `महाराष्ट्र टोलमुक्त झाला आणि कुणाला कळलंदेखील नाही. किती भूल थापा माराल. खरंच राजसाहेबांनी जे नाव ठेवलं होतं ते किती चपखल आहे. 'भाजपकुमार थापाडे`, असा टोला या पोस्टमधून लगावण्यात आला आहे. टोल नाक्यांवरून सुरू झालेले हे राजकारण पुढील काही दिवस असेच सुरू राहणार असे दिसते.
राज्यातील टोल नाके हा मनसेसाठी पहिल्यापासून जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. मनसेने केलेल्या टोल नाक्यांविरोधातील आंदोलनानंतरच राज्यातील पन्नासहून अधिक टोल नाके बंद झाल्याचा दावा केला जातो. अधूनमधून टोल नाक्यावर खळ्ळ खट्याकचा आवाजही घुमतो. त्यामुळे टोल नाक्यांच्या विषयावर मनसे किती गंभीर आणि ठाम आहे, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.
ठाण्यातील पाच टोल नाक्यांवर करण्यात आलेल्या शुल्कवाढीने मनसेला त्यांच्या आवडीचा आणखी एक मुद्दा मिळाला आहे. अविनाश जाधव यांच्या उपोषणाने हा विषय चिघळणार हे मात्र नक्की. राज ठाकरे यांनीही यावर आक्रमक भूमिका घेतल्याने ठाण्यातील या टोल नाक्याचा विषय लवकरच मार्गी लागेल, असे बोलले जाते.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.