Fake birth death certificate issue Sarkarnama
महाराष्ट्र

Fake birth death certificate issue : फेक जन्म-मृत्यू रॅकेटचा भंडाफोड; सोमय्यांचा देशभर 'धडाका', तर चौधरींनी जामिया ‘कनेक्शन’वर ठेवलं बोट

Kirit Somaiya in Yavatmal Vijay Chaudhary in Nandurbar Serious Allegations on Akkalkuwa Jamia Islamia Over Certificate Issue : जन्म-मृत्यू बनावट प्रमाणपत्राचं देशव्यापी कनेक्शन सांगून, भाजपचे किरीट सोमय्या आणि विजय चौधरी यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Pradeep Pendhare

BJP allegations Maharashtra : जन्म-मृत्यू बनावट प्रमाणपत्राच्या मुद्यावर, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी, याची व्याप्ती पाच राज्यात असून, हा मुद्दा देशव्यापी झाल्याचे सांगितले.

भाजपचे सरचिटणीस विजय चौधरी यांनी, नंदुरबार पोलिसांनी जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे बनावट तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर, त्याचे कनेक्शन अक्कलकुवा इथल्या जामिया इस्लामिया संस्थेशी असल्याचा गंभीर दावा केला. किरीट सोमय्या आणि विजय चौधरी यांनी जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या बनावटगिरीमागे केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्रातील प्रशासकीय अन् राजकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.

यवतमाळ इथळ्या शेंदुरसनीसह विविध ठिकाणी बनावट जन्म नोंदी आढळल्या आहेत. भाजपचे (BJP) किरीट सोमय्या यांनी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना, हा मुद्दा आता देशव्यापी झाला आहे. याचा तपास पाच राज्यांपर्यंत पोहोचला असून, याची व्याप्ती मोठी आहे, असे सांगितले.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, "बनावट नोंदीचा हा घोटाळा मोठा आहे. आतापर्यंत बिहार, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये याची गँग सक्रिय असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे." संबंधित टोळ्यांनी संपूर्ण जन्म नोंदणी प्रणालीच हॅक केल्याचा संशय माजी खासदार सोमय्या यांनी व्यक्त केला.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एका गावची लोकसंख्या अवघी 1500 असताना, ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर 2025 या तीन महिन्यांत तब्बल 15 हजार 570 जन्म नोंदी झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या नोंदींमधील एकही व्यक्ती महाराष्ट्रातील नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र पोलिस महासंचालक यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

सोमय्यांचे गंभीर प्रश्न; राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न?

एसआयटी तपासात जन्म नोंदी हॅक करून बनावट पासपोर्ट, बेनामी फंड ट्रान्स्फर आणि लाभार्थी कोण, याचा सखोल तपास सुरू आहे. स्लिपर सेल तयार होत आहेत का? दहशतवादासाठी याचा वापर होतोय का? याची चौकशी पोलिस महासंचालकांनी गांभीर्याने करावी, अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

जामिया संस्थेवरील गंभीर आरोपांनी खळबळ

दरम्यान, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी, नंदुरबार इथं पोलिसांनी बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यावर खळबळजनक दावा केला. नंदुरबार शहरात गेल्या सहा वर्षांपासून बनावट जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड, रेशन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश नंदुरबार पोलिसांनी केला आहे. या बनावट कागदपत्रांच्या रॅकेटचे धागेदोरे अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया संस्थेशी संबंधित असल्याचा गंभीर दावा भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी केला आहे.

विजय चौधरींना मोठी शंका

विजय चौधरी यांनी आरोप केला आहे की, नंदुरबार शहरात सुरू असलेले हे केंद्र देशद्रोही घटकांना मदत करणारे ठिकाण ठरत होते. बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या माध्यमातून परराज्यातून आणि इतर देशांतून आलेल्या व्यक्तींना, विशेषतः यूपी आणि बिहारमधील नागरिकांना, खोटे दस्तावेज उपलब्ध करून दिले जात होते. या प्रकरणात जामिया इस्लामिया शिक्षण संस्थेचे संस्थाचालक यांचेही संबंध आहे, असा गंभीर आरोप केला. यापूर्वीही ही कारवाई अक्कलकुवा इथं सुरू होती, त्यानंतर हे केंद्र नंदुरबार शहरात स्थलांतरित करण्यात आल्याचेही चौधरी यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT