Bhaskar Bhagare News : महायुती सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. या महिना अखेरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कर्जमाफीमधील काही जाचक अटीमुळे मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याचा धोका होता. मात्र, सरकारने जाचक अटी मागे घेतली आहे.
२०१९ च्या लाभार्थ्यांना नव्या योजनेतून वगळण्याची अट आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी २०२५-२६ ची जाचक अट, या दोन्ही अटी सरकारने पूर्णपणे काढून टाकल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
या घोषणनेनंतर खासदार भास्कर भगरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, 'मायबाप शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनासह छत्रपती संभाजीनगर येथे ऐतिहासिक एल्गार लढा पुकारण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपल्या पक्षातील नेत्यांनी रस्त्यावरील संघर्षासोबतच विधानसभेतही सरकारचे सातत्याने लक्ष वेधले होते. हा विजय आपल्या पक्षाने केलेल्या संघर्षाचा आहे.
ते म्हणाले, यापूर्वी शासनाने कर्जमाफी देताना अनेक जाचक अटी ठेवल्या होत्या, ज्यामुळे असंख्य शेतकरी लाभापासून वंचित राहत होते. हे लक्षात घेऊन, महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या जाचक अटी रद्द करण्यासाठी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने तीव्र पाठपुरावा केला गेला.अखेर या संघर्षाला आणि शेतकरी एकजुटीला मोठे यश आले आहे.
शेतकरी हिताचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि सरकारचे मनापासून आभार. हा विजय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अविरत संघर्षाचा आणि मायबाप शेतकऱ्यांच्या अभेद्य एकजुटीचा आहे! हे जरी यश मिळाले असले, तरी मायबाप शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या प्रत्येक न्याय्य हक्कासाठी, त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 'सडक से संसद तक' आपला हा लढा असाच अविरत सुरू राहील, असे देखील ते म्हणाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.