ShaktiPeeth Highway : नागपूर ते गोवा हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या विरोधामुळे राजकीय आणि सामाजिक प्रश्न बनला आहे. या संपूर्ण महामार्गासाठी जमिनींचे अधिग्रहण होणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनी नुकतेच मुंबईत आंदोलनही केले. परभणी, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापू या विविध जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांचा मुंबईमधील आंदोलनात सहभाग होता.
यातही विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कोल्हापूरमधून जास्त आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार हा महामार्ग करण्यावर ठाम आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना पाचपट मोबदला देण्याची सरकारची तयारी आहे. पण शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. अशात जिल्ह्यातील सर्व आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे या आमदारांसाठी फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून समर्थन करायचे की शेतकऱ्यांचा विचार करून विरोध करायचा हे धर्मसंकट उभे आहे.
ज्या आमदारांच्या मतदारसंघातून हा महामार्ग जात नाही. अशा लोकप्रतिनिधींनी थेट समर्थन दिले आहे. तर ज्यांच्या मतदारसंघातून हा महामार्ग जातो, तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध पाहता आमदार आणि मंत्री बुचकळ्यात पडले आहेत. याला अगदी पालकमंत्री प्रकाश आबिटकरही अपवाद नाहीत. नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा पार पडला. यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांच्या आडून विरोध करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांनी देखील यु-टर्न घेतल्याचे पाहायला मिळाले होते.
सुरुवातीला काहींनी शेतकऱ्यांची जी भूमिका असेल तीच आमची भूमिका असेल, असे सांगत अप्रत्यक्षपणे शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविला होता. कारण मतदारसंघातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याने त्यांच्या विरोधात पण जाऊन चालणार नाही, याची जाण या आमदारांना आहे. मात्र फडणवीस यांनाही दुखावण्याची मानसिकता या आमदारांची नाही. त्यामुळे महायुतीतील आमदारांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.
कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी शक्तिपीठ महामार्गाला समर्थन दर्शवले आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांची जी काही अडचण आहे ती सोडवू पण शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे अशी भूमिका त्यांची आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश क्षीरसागर यांनीही शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मेळावा घेतला आहे. करवीरचे आमदार चंद्रदीप नरके हे पाठिंब्याच्या व्यासपीठावर फारसे दिसत नसले तरी त्यांचाही या महामार्गाला पाठिंबा आहे, काही दिवसांपूर्वीच पालकमंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना चारपट मोबदला देण्याची मागणी केली होती.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरुवातीला या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला. पण त्यांची सध्याची परिस्थिती तळ्यात-मळ्यात आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत असेल आणि त्यांनी समर्थन दिले तर माझी भूमिका शेतकऱ्यांच्या सोबतच राहील असं वक्तव्य करून त्यांनी यु टर्न घेतला आहे. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांची भूमिका अजून उघड नाही. पण ते फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध नसणार असेच सगळे गृहीत धरत आहेत.
हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी देखील सुरुवातीला विरोध केला होता. मात्र त्यांची मानसिकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न दुखावण्याची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची समजूत काढण्यापर्यंत त्यांनी तयारी केली आहे. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा आधी विरोध होता. अगदी आंदोलनात उतरण्याची त्यांची तयारी होती. पण आता मात्र त्यांनी पद्धतशीर मौन पाळले आहे. इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांची भूमिका अजूनही तळ्यात मळ्यात आहे.
सगळ्यात मोठे धर्मसंकट आहे ते पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर. जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित शेतकरी या मतदारसंघातील आहेत. सध्या तरी त्यांची शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका आहे. पण दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही न दुखावण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मात्र ते सध्या तरी आपल्या भूमिकेवर ठाम दिसत आहेत. त्यामुळे उघड उघड बोलण्याचीही त्यांची अडचण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.