Gen Z protests  Sarkarnama
महाराष्ट्र

Gen Z News : महाराष्ट्रात एकमेव 'जेन झी' आमदार : देशभरात फक्त 26 प्रतिनिधी; तरुण पिढी राजकारणाबाहेरच?

Gen Z politics News : रस्त्यावरील आंदोलने, सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये 'जेन झी'चा आवाज उस्फूर्त आहे. पण, देशातील सर्वोच्च सभागृहांमध्ये आणि निर्णयाच्या केंद्रस्थानी मात्र 'जेन झी'चा आवाज अजूनही क्षीणच आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : सध्या देशभरात 'जेन झी'चे आंदोलन गाजत आहे. नीटच्या प्रश्नावरून आंदोलन करताना केंद्र सरकारला बॅकफुटवर आणलेल्या 'जेन झी'चे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. जंतर मंतर मैदानावरील आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. रस्त्यावरील आंदोलने, सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये 'जेन झी'चा आवाज उस्फूर्त आहे.

त्याचवेळी दुसऱ्या बाजूला देशातील सर्वोच्च सभागृहांमध्ये आणि निर्णयाच्या केंद्रस्थानी मात्र 'जेन झी'चा आवाज अजूनही क्षीणच आहे. देशभरात 'जेन झी' पिढीतील केवळ २६ प्रतिनिधी संसदेत, त्यात लोकसभेतील सहा खासदार आणि २० आमदारांचा समावेश आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत. निवडणूक लढवण्यासाठी किमान वय २५ वर्षे असल्याने या पिढीतील मोठा वर्ग अद्याप निवडणुकीच्या राजकारणापासून कोसो अंतर दूरच राहिला आहे.

देशाच्या लोकसंख्येच्या चतुर्थांशपेक्षा अधिक वाटा 'जेन झी'चा आहे. देशभरात सुमारे २५.८% लोकसंख्या 'जेन झी' ची आहे. १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेले युवक या पिढीचे आहेत. परंतु, २५ वर्षांची वयोमर्यादा आणि इतर राजकीय समीकरणांमुळे संपूर्ण देशात केवळ २६ 'जेन झी'चे लोकप्रतिनिधी आहेत. दुसरीकडे या पिढीचे संसदेत आणि विधानसभांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्याची संख्या मर्यादितच दिसत आहे.

देशभरात 'जेन झी' पिढीतील राज्यानुसार खासदार, आमदारांची आकडेवारी पहिली तर १८ व्या लोकसभेत पहिल्यांदाच 'जेन झी' पिढीतील ६ खासदारांनी प्रवेश केला आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश राज्यातील दोघेजण समाजवादी पक्षाचे आहेत. कौशांबीचे खासदार पुष्पेंद्र सरोज, मछली शहरचे खासदार प्रिया सरोज. कर्नाटकातील दोन खासदार आहेत. त्यामध्ये बिदरचे काँग्रेसचे खासदार सागर खंड्रे, काँग्रेसचे चिक्कोडीचे खासदार प्रियंका सतीश जारकीहोळी, राजस्थानमधील भरतपूरचे काँग्रेस खासदार संजना जाटव, बिहारमधील समस्तीपूरचे लोक जनशक्ती पक्षाचे खासदार शांभवी चौधरी यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्यातील खासदार व आमदारांची संख्या पाहिली तर राज्यात एकमेव 'जेन झी' पिढीतील आमदार आहेत. तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित आर. आर. पाटील हे एकमेव आमदार आहेत. त्यांचा जन्म १९९८-९९ च्या सुमारास झाला आहे. ते सध्याच्या महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात तरुण आमदार आहेत.

त्यानंतर महराष्ट्राच्या विधानसभेत ३० ते ४० वयोगटातील आदित्य ठाकरे, श्रीजय चव्हाण, वरुण सरदेसाई, रोहित पवार यांच्यासारखे अनेक तरुण आमदार आहेत. परंतु ते जनरेशन वाई मिलेनिअल्स या श्रेणीत येतात, 'जेन झी' मध्ये येत नाहीत. देशातील राज्यनिहाय आमदार पहिले तर तमिळनाडूमध्ये ४, पश्चिम बंगाल ३, बिहार २, मेघालय २, तेलंगणा २, महाराष्ट्र १, हरियाणा १, राजस्थान १, आसाम १, ओडिशा, आंध्र प्रदेश , पुदुच्चेरी १ असे एकूण २० आमदार आहेत.

पक्षीय बलाबल पहिले तर 'जेन झी' खासदारांमध्ये काँग्रेसचे तीन खासदारासह अव्वलस्थानी आहे, तर आमदारांमध्ये भाजपचे ५ आमदार सर्वाधिक आहेत. खासदारमध्ये महिलांचे वर्चस्व आहे. ६ पैकी ४ खासदार महिला आहेत. ६ पैकी ५ खासदारांची कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी आहे. राजस्थानच्या संजना जाटव या मात्र घराणेशाहीतुन पुढे आलेल्या नाहीत. तर दुसरीकडे मात्र, २० पैकी १२ आमदार स्वतःच्या बळावर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT