Gopinath Munde farmer accident scheme Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra farmer scheme : शेतकरी, शेतमजुरांसाठी आनंदाची बातमी; सरकारने दोन लाख रुपयांच्या अपघात अनुदानाबाबत घेतला मोठा निर्णय

Gopinath Munde accident scheme, farmer accident grant, farm labourer accident grant : गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा योजनेचा विस्तार; शेतकरी, महिला शेतकरी व भूमिहीन शेतमजूर कुटुंबातील १० ते ७५ वर्षे वयोगटातील प्रत्येक सदस्याला आता अपघाती मृत्यू वा अपंगत्वावर २ लाखांपर्यंत अनुदान.

Rajanand More

Farmer accident insurance Maharashtra : राज्य सरकारने शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून आता या योजनेत शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आता या योजनेचा लाभ शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातील प्रत्येक सदस्यालाही मिळणार आहे.

राज्यात मागील तीन वर्षांपासून ही योजना राबविली जात आहे. या योजनेची व्यापी वाढविण्याबाबतचा शासन निर्णय गुरूवारी जारी करण्यात आला आहे. जीआर मध्ये म्हटले आहे की, ही योजना आतापर्यंत केवळ सात बारावर नाव असलेल्या खातेदार शेतकरी आणि त्या कुटुंबातील एका व्यक्तीसाठी म्हणजे एकूण दोन व्यक्तींसाठीच लागू होती.

राज्यात शेती व्यवसायामध्ये प्रत्यक्ष राबणाऱ्या भूमिहीन शेतमजूरांचा वाटा मोठा असून कामाच्या ठिकाणी त्यांना अपघाताचा धोका असतो. तसेच महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत महिला शेतकरी म्हणून नोंद होणार आहे. यापार्श्वभूमीवर शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

त्याचप्रमाणे शेतकरी, महिला शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर कुटुंबातील १० ते ७५ वर्षे वयोगटातील सर्व सदस्यांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार आता योजनेच्या नावातही बदल करण्यात आला आहे. यापुढे ही योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने ओळखली जाईल.

योजनेचा कालावधी १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ असा पाच वर्षांचा असणार आहे. योजनेनुसार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास संबंधित शेतकरी, शेतमजूर किंवा त्यांच्या कायदेशीर वारसदारांना अनुदान मिळेल.

या अपघातानंतर मिळणार नाही अनुदान

नैसर्गिक मृत्यू, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या, युध्द, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकांकडून खून, गुन्ह्याच्या उद्देसाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, वयोगट १० ते १८ वर्षे दरम्यान वाहन चालवत असताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात आणि मोटार शर्यतीतील अपघात.

अनुदानासाठी हे अपघात ग्राह्य -

रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, वीजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून मृत्यू, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगलीतील मृत्यू किंवा अपंगत्व, आकस्मिक अपघातामुळे झालेला अंतर्गत रक्तस्त्राव, उष्माघात.

असे आहे अनुदानाचे स्वरुप -

अपघाती मृत्यू - २ लाख रुपये

अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे - २ लाख रुपये

अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे - २ लाख रुपये

अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकाणी होणे - १ लाख रुपये

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT