शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा करत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. पेरणी, खतांचा पुरवठा, बियाण्यांच्या तक्रारी तसेच कर्जमाफी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल आणि दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या खरीप हंगामात मका, सोयाबीन आणि सूर्यफूल या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. मात्र काही भागांत बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विभागाने 85 बोगस खत व बियाणे कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना तातडीने बियाणे बदलून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात युरिया, डीएपी आणि इतर रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी खतटंचाईबाबत कोणतीही चिंता करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. काही भागांत पावसाचे प्रमाण कमी असले तरी आगामी काळात सर्वत्र समाधानकारक पाऊस होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी विभागाकडून प्रत्येक शेतकऱ्याला शक्य ती मदत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात यंदा पावसाची स्थिती समाधानकारक असल्याचे सांगताना त्यांनी आतापर्यंत सरासरी 94 टक्के पावसाची नोंद झाल्याचे नमूद केले. विभागनिहाय पाहता कोकणात 111 टक्के, नाशिकमध्ये 83 टक्के, पुणे विभागात 87 टक्के, मराठवाड्यात 77 टक्के आणि विदर्भात 73 टक्के पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 84 टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून अमरावती विभाग पेरणीच्या बाबतीत आघाडीवर असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेबाबत बोलताना भरणे यांनी सांगितले की, 16 लाख 96 हजार शेतकरी खात्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीयकृत बँकांमधील ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी कर्ज आणि व्याजाच्या रकमेत तफावत आढळून आली होती.
मात्र 2 लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. उर्वरित रक्कम बँकांकडून समायोजित केली जाईल आणि संबंधित शेतकऱ्यांना नील दाखला देऊन नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. तसेच 2017 च्या कर्जमाफी योजनेत वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.