पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. ज्यात 26 निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारतासह जगभरातून पाकिस्तानवर टीका होत आहे. यादरम्यान पुन्हा एकदा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारलं आहे. ओवैसी यांनी आयएसआय पाकिस्तानची नाजायज औलाद असल्याची टीका केली आहे.
पहलगाममधील हल्ल्यानंतर आता देशभर संताप व्यक्त केला जात असून पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करण्याची मागणी होत आहे. यानंतर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी थेट पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या. हवं तर त्यासाठी युद्ध करा, अशी मागणी केली आहे. तर जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आहे, तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार असाही दावा आठवले यांनी केला आहे.
शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाचे कौतुक करताना शिवसेना ठाकरे गटासह खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आम्ही असं तस नाही, तर छप्पर फाड के निवडून आलो. ते ही संजय राऊत आणि विरोधकांच्या छाताडात विजयाचा भगवा गाडून आलोय, असे म्हटलं आहे.
मंत्री योगेश कदम यांच्या मतदार संघात झालेल्या दगडफेक प्रकरणावरुन महायुतीतील दोन मंत्री आमने-सामने आले आहेत. मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पलटवार करताना मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असा टोला, लगावला आहे.
माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी त्यांच्यावर कोंबडीवाले म्हणत टीका करणाऱ्या ठाकरे गटाला चांगलेच खडसावले. भ्रष्टाचारा पेक्षा किंवा कोविडमध्ये पैसे खाण्यापेक्षा व्यवसाय केलेला कधीही चांगला, असा टोला राणे यांनी लगावला. 1982 मध्ये मुंबईत आपण चिकनचा व्यवसाय करायचो, स्वतःच दुकान होतं आणि त्यातून मला 64 हजार रुपये मिळायचे, असे राणे यांनी म्हटले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर होते. संगमेश्वर येथे असताना अचानक त्यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. मधमाशांच्या हल्ल्यात ताफ्यातील काही पोलिस अधिकारी, कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सरदेसाई वाड्याची पाहणी करताना मधमाशांचा हा हल्ला झाला. अजित पवारांना वेळीच तिथून सुरक्षित ठिकाणी हलवल्याने ते यातून बचावले.
माझा मतदारसंघ शांत कसा ठेवायचा हे मला चांगल माहित आहे. त्यांनी कुठे सभा घ्यावी? काय घ्यावी? हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील तर मला आनंद आहे. पण माझ्यावर जर ते टीका करत असतील तर माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असा टोला मंत्री योगेश कदम यांनी दुसरे मंत्री नितेश राणे यांना लगावला आहे. नितेश राणे माझे मित्र, पण माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, अशी टीकाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नितेश राणे यांनी दापोलीतील सभेत केलेल्या उत्तर देताना केली.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटक मारले गेले. या घटनेनंतर देशात संतापाचे वातावरण असून पाकला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. तृणमल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. पाकिस्तानवर आता सर्जिकल स्ट्राईक नको, तर पाक व्याप्त काश्मीरच ताब्यात घ्या, अस म्हटले आहे.
समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणू या खोऱ्याची तूट भरून काढण्यासाठी आम्ही योजना आखली आहे. त्याचा डीपीआर देखील तयार झाला असून या मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचे माझे स्वप्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन, नागरिकांना पिण्यासाठी जशी गरज आहे, तशीच उद्योगांनाही पाणी लागते. त्यामुळे मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पाकिस्तानचा बुट्टो सांगत आहे की, सिंधु नदीचे पाणी थांबवले तर त्याच नदीत हिंदूंचे रक्त दिसेल, अरे अख्ख्या पाकिस्तानमध्ये ताकद नाही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. कारण, भारतात एक वाघ राहतात, ज्याचं नाव नरेंद्र मोदी, अमित शहा आहे. आता पाणी काय तुमचं दाना पण बंद करू, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे भुट्टो सारख्याला भुट्ट्यासारखं भाजतील, मला मोदीजी, अमित शहा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील नऊ दहशतवाद्यांची घरे आतापर्यंत भारतीय लष्कारांनी उद्ध्वस्त केली आहेत. ही घरे बॉम्बने उडविण्यात आली आहेत. यामध्ये कुपवाडा, पुलवामा, त्राल, शोपियान येथील घरांचा समावेश आहे.
‘महाराष्ट्रातील जनता आपली वाट बघतेय, उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र या’ असे आवाहन करणारा बॅनर आता थेट मातोश्रीच्या बाहेर लावण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मायेची सावली....एक हात कर्तव्याचा असेही या बॅनरवर लिहिण्यात आलेले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना शहिदांचा दर्जा देण्यात यावा. तसेच, त्यांना मानसन्मानही देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केले आहे.
पोलिस आणि गृहखात्याबाबत वादग्रस्त विधान करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून तंबी दिली आहे. पुन्हा अशी विधानं होणार नाहीत, याची काळजी घ्या, अशी ताकीदही शिंदेनी दिल्याची माहिती आहे. गायकवाडांच्या विधानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच नापसंती व्यक्त केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली यात्रा रविवारपासून सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने मंत्री आदिती तटकरे उपमुख्यमंत्री अजित पवार चिपळूण तालुक्यामधील सावर्डे येथे दाखल झाले होते. अजित पवार यांचे यावेळी जंगी स्वागत देखील करण्यात आले. संभाजी महाराजांना अटक झालेल्या सरदेसाई वाडा या ठिकाणी अजित पवार हे भेट देणार आहेत. या स्मारका संदर्भात अजित पवार यांचा आजचा दौरा आहे.
एकमेकांचे कट्टर विरोधक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे पहिल्यांदा समोरासमोर आले. खरगोन ते मुक्ताईनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारी करणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत, त्यांना योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकरी संघर्ष समिती तर्फे रस्त्याचे कामकाज बंद पाडण्यात आले. या आंदोलनामध्ये शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे हे दोन्ही कट्टर विरोधी एकत्र आले होते.
पहलगाम मध्ये हल्ला झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे जात पर्यटकांना परत आणण्याची तजवीज केली. या हल्ल्याबाबत बोलताना त्यांनी सध्या विदेशात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मी घरातून बाहेर पडतो. पण काही लोक घरातून बाहेर पडतच नाहीत. पण मी जेव्हा-जेव्हा संकट येत तेव्हा मी तिकडे जातो. काही लोक घरातून बाहेर पडले की ते पार देशाच्या बाहेरच जातात. पण जाऊ द्या. त्यांचं त्यांना लखलाभ असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवाद्यांना कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. पीएम मोदी म्हणाले, या दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयांचे रक्त खवळले आहे. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात देशाची एकता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. जगभरातील नेत्यांनी या हल्ल्याची निंदा केली. त्यांनी मला फोनवर, पत्र पाठवत आणि संदेश देत या लढाईत भारतासोबत असल्याचे सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मधील तणाव वाढला आहे. त्यापार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जम्मू काश्मीर मधील नागरिकांकडून बंकर सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. हल्ला झाल्यास सुरक्षित राहण्यासाठी लाइन ऑफ कंट्रोल शेजारील नागरिकांकडून सुरक्षेची तयारी सुरु करण्यात आलेली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतेय. बाजार समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप नेत्यांमध्ये दोन गट पडले असून दिग्गज आमदारांमध्ये चढाओढ लागली आहे. माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल उभे केले आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपचेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या सोबतीने श्री सिद्धेश्वर बाजार समिती विकास पॅनलचे आव्हान उभे केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारतामुळे पाकिस्तानबरोबर तणाव वाढला आहे, गेल्या तीन दिवसांत वाघा बॉर्डरवरून 450 हून अधिक भारतीय पाकिस्तानातून मायदेशी परतले आहेत. शनिवारी निघालेल्यांमध्ये 23 भारतीयांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी येथे सांगितले, जे पीएसएल (पाकिस्तान सुपर लीग) 2025च्या प्रसारण कंपनीचा भाग होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सुमारे 300 भारतीय घरी परतले आणि गुरुवारी सुमारे 100 भारतीय या मार्गाने घरी परतले. ते म्हणाले की, यासोबतच 200 पाकिस्तानी नागरिकही भारतातून घरी परतले आहेत.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची चर्चा होती. ठाकरेंचा पैलवान पक्षाला रामराम ठोकणार, अशी चर्चा होती. चंद्रहार पाटलांसाठी सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी पंगा घेतला होता. पण आता, हेच पाटील एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्याची चर्चा होती, त्यावर आता चंद्रहार पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझे मित्र व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांनी मला स्नेह भोजणाचे आमंत्रण दिले होते, भोजन करून 15 ते 20 मिनिटात मी बाहेर पडलो. या वेळी राज्यातील क्रीडा क्षेत्राबाबत चर्चा झाली, परंतु माझ्या हितशत्रुंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या, असा आरोप चंद्रहार पाटील यांनी केला.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल आक्षेपार्ह टीका केली होती आणि आज याबाबत त्यांनी विधानावर ठाम असून पोलिसांची दिलगिरी मागतो, असे स्पष्ट केलं. शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी ही सरकारची नामुष्की आहे, आधी पोलिसांचा खच्चीकरण करायचं आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करायची यावर खरंतर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असा टोला लगावला.
दशकापूर्वी नियम आता लागू होत नाही. आजच्या आक्रमक राजकीय वातावरणात विरोधकांना चिरडून टाकणे आणि माध्यमांना कमकुवत करणे हे ध्येय आहे, अशी टीका लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. हैदराबाद इथं भारत परिषद 2025 मध्ये राहुल गांधी सहभागी झाले होते.
दहशतवादी कारवायांना धडा शिकवण्यासाठी सिंधू जल कराराअंतर्गत पाकिस्तानच्या वाट्याला जाणाऱ्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर कसा करून,घ्यायचा यासाठी केंद्र सरकार अभ्यास करण्याची योजना आखत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठकीत याविषयी मंडलेल्या प्रस्तावर चर्चा झाली. सिंधू जल करारासंबंधी पुढील कृतीवर चर्चा करण्यात आली.
गडचिरोलीमधील भामरागड एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झालेल्या गाय वाटप घोटाळ्याप्रकरणी दोषी आढळलेले तत्कालीन प्रकल्प अधिकारी 'IAS' शुभम गुप्ता यांची आदिवासी विकास विभागाने पुन्हा विभागीय चौकशी सुरू केली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ही माहिती दिली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत. जे.पी.नड्डा यांच्या हस्ते शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या ट्रू बीट युनिटचे उद्घाटन आणि हॉस्पिटलच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
मुंबईतील कैसर हिंद बिल्डिंगमध्ये आज पहाटे भीषण आग लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच इमारतीमध्ये ईडीचं (ED) कार्यालय असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कार्यालयापर्यंत आग गेल्यास मोठा अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे.
महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं, भारतात आणि जगात कुठेही नाही. पोलिसांनी छापेमारीत 50 लाख पकडले तर ते 50 हजारच दाखवतात, असं वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर केकेल्या वक्तव्या प्रकरणी गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या प्रस्तावित आराखड्याचा आढावा घेणार असून, जागेची पाहणी देखील करणार आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाईला सुरूवात केली आहे. अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी सर्च ऑपरेशन करण्यात आलं असून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 हून अधिक लोकांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 48 तासांत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहांनी दिलेली मुदत आज संपली असून पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा देखील आजपासून रद्द करण्यात येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.