सत्तेचा दुरुपयोग करून महाराष्ट्राच्या लेकीबाळींना धमकावणाऱ्या संजय शिरसाटांना फडणवीस साहेब सत्तेत कसे काय सहन करू शकतात. फडणवीस साहेबांनी तातडीने शिरसाटांचा राजीनामा घेतला पाहिजे. असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
वैष्णवीच्या आत्महत्याप्रकरणात फरार सासरा आणि तिच्या दीराला मदत करणाऱ्यांची नावे समोर आली. त्यावरुन, आरोपी राजेंद्र हगवणे याला आसरा देणाऱ्या 5 जणांना पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. काँग्रेस नेते आणि माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील (कर्नाटक) यांचा मुलगा प्रीतम पाटील याचाही यात समावेश आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईच्या नियोजन बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना डावलले गेले होते. यासंदर्भात आपण संजय राऊत यांना तक्रार केली असता मुंबई महापालिका हा विषय ठाकरे फॅमिलीचा आहे, सर्व निर्णय ठाकरे फॅमिली आणि मित्र परिवार घेणार, एकनाथ शिंदेंना सांग मुंबई महापालिकेत लक्ष घालू नका, हा माझा निरोप दे,असेही संजय राऊत यांनी मला सांगितल्याचा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला.
सामाजिक न्याय मंत्री, जे त्यांचा घरात न्याय करत नाहीत, ते महाराष्ट्राच्या समाजासाठी काय खाक न्याय मिळवून देणार ? हे माझा वैयक्तिक प्रकरण? असे ते म्हणूच कसे शकतात? घरची प्रकरणे ही सगळ्यांच्याची वैयक्तिकच असतात. पण त्यात त्या मुलींचा छळ होणं आणि तिला न्याय मिळवून देणे हा सामाजिक मुद्दा नाही का ? तिने दिलेली legal notice मागे घेण्यात आली ह्यावरून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे हे स्पष्ट दिसतय, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सिंद्धात शिरसाट प्रकरणात केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांस अटक करण्यात आली आहे. 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने त्यांना अटक केली. विनोद खिरोळकर असं आरडीसींचं नाव आहे. वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठीपूर्वी या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार, संबधित तक्रारदाराकडून 23 लाख रुपये घेतले होते. मात्र, तरीही 18 लाख पुन्हा मागण्यात आले होते.
महसूल खात्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपसामध्ये वाटणी करायची असेल तर एकूण रेडीरेकनरच्या एक टक्के किंमत मोजावी लागायची. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता फक्त 500 रुपयांमध्ये ही वाटणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणारे भाजपचे मीरा भाईंदरचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांना सरनाईक यांच्या वतीने ॲड. राजदेव पाल यांनी नोटीस पाठवली आहे. प्रताप सरनाईक यांची ७२ तासांत माफी मागा; अन्यथा २१० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोठावण्यात येईल, असा इशारा ॲड पाल यांच्याकडून देण्यात आला आहे.
संजय शिरसाट यांच्या सुनेनेचे शिरसाट आणि त्यांच्या मुलांवर गंभीर आरोप केले आहेत. काही वेळापूर्वी या आरोपातून संबंधित महिलेने माघार घेतल्याचे जाहीर केले होते. शिरसाटांची कार्यपद्धती आणि डांबरपटपणा पाहता ते त्या महिलेला इजा करू शकतात. त्यामुळे तिची सुरक्षा महत्वाची आहे. तिला धमकावलं असण्याची, तिला दबावात घेतलं असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
मुंबई तुंबल्यानंतर सरकारवर विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तुटून पडणारे आदित्य ठाकरे यांना माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिले. जुलै-ऑगस्टमध्ये मुंबईत आणखी पाऊस पडतो. अशावेळी सरकारला मदत करायाची सोडून मंत्र्यांवर टीका केली जात आहे. एकनाथ शिंदे यांचा उल्लेख यूडी मिनिस्टिर असा उल्लेख केला जातो. काय ही बोलण्याची पद्धत झाली. आदित्य ठाकरेंना नीट धड मराठी बोलता येत नाही. तोत्रा बोलतो, तो. आम्ही नक्कल केली तर काय होईल. उद्धव ठाकरेंची नक्कल केली तर काय होईल, असा सवाल राणे यांनी केली.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. त्या महिलेने आता माघार घेतली असून हा माझा पर्सनल मॅटर आहे. तो मला इथेच क्लोज करायचा आहे. मी जी नोटीस सिद्धांत शिरसाट यांना पाठवली आहे, तो विषयही मला इथेच थांबवायचा आहे, असेही संबंधित महिलेने सांगितले.
छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे आरोग्य विभागातील बोगस व अपात्र कर्मचाऱ्यांविरोधात तसेच जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराविरोधात लाक्षणिक साखळी उपोषण करण्यात आले.या उपोषणाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केले.अनेक आंदोलने आणि निवेदने देऊनही प्रशासनाने ठोस कार्यवाही न केल्यामुळे अखेर संघटनेने रस्त्यावर उतरून संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेचा छळ करुन तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे प्रकरण राज्यभरात गाजत असतानाच नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंतरजातीय लग्न मान्य नसल्यामुळे सासरच्यांनी सूनेचा छळ केला. तसेच तिचा घरीच गर्भपात केल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रकरणी पीडित महिलेने नाशिकमधील आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देत पोलिसांनी सासू सुचित्रा पाठक, सासरे प्रवीण पाठक, ननंद स्मिता पाठक आणि पती भूपेश पाठक या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात जवळपास २० मिनिटांची बंद दरवाज्यामागे बैठक पार पडली. या बैठकीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी, ती विविध चर्चांना खतपाणी घालणारी ठरली आहे.
शहरात कार्यरत असलेल्या हेलिकॉप्टरची संख्या राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत अधिक असल्याने, भारतीय विमानतळ प्राधिकरण पुण्यात स्वतंत्र हेलिपोर्ट उभारण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. या प्रकल्पासाठी हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरची जागा संभाव्य स्थळ म्हणून विचाराधीन आहे. सद्यस्थितीत ही जागा विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या पुणे शहरात सुमारे २० हेलिकॉप्टर कार्यरत असून त्यांच्यासाठी १३ हेलिपॅड उपलब्ध आहेत. वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर विशेषत: व्यावसायिक आणि आपत्कालीन सेवांसाठी एक केंद्रीत हेलिपोर्ट आवश्यक असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव प्राधिकरणाच्या प्राथमिक विचाराधीन टप्प्यात आहे.
भारत-बांग्लादेश बॉर्डरवर पुन्हा एकदा तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असून ही घटना मंगळवारी (ता.27) घडली आहे. येथे कुरीग्रामच्या बोराइबारी आणि आसमच्या मनकाछार सीमेवर BSF आणि BGB (बांग्लादेश बॉर्डर गार्ड) आमने-सामने आले. येथील नो मॅन्स लँडमध्ये काही नागरीक अडकले असून त्यांना परत धाडण्यासाठी BSF कडून फायरिंग करण्यात आल्याचेही आता सांगण्यात येत आहे.
सध्या महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून आगामी स्थानिकच्या तोंडावर बेरजेची गणित नेते पाहत आहेत. अशातच काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने थेट महायुतीचा रस्ता न धरता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पसंती दिली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी यांनी किशोर गजभिये यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशानंतर लगेच शरद पवार यांनी त्यांच्यावर जबाबदारी देत थेट प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरमधून घेतला. यानंतर याची जगभरात चर्चा झाली. तर या ऑपरेशनसाठी हेच नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुचवले होते. पण आता याच्या लोगोची चर्चा सुरू झाली आहे. तर हा लोगो भारतीय लष्करातील दोघांनी केला असून याचं श्रेय लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंह यांना जातं.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी (ता. 27) राजद नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तेजस्वी यादव यांना मुलगा झाल्याने त्यांचे अभिनंदन केले. यावेळी तेजस्वी यादव म्हणाले, "आज कुटुंबात एक नवीन सदस्य सामील झाला आहे. मला संपूर्ण बिहार आणि देशभरातून प्रेम मिळत आहे. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या, त्यांचे मी आभार मानतो. विशेषतः दीदींचे (ममता बॅनर्जी), असेही त्यांनी म्हटलं आहे.
"काल 26 मे होता... 26 मे 2014 रोजी मला पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था जगात 11 व्या क्रमांकावर होती. आपण कोरोनाशी लढलो, शेजाऱ्यांकडून येणाऱ्या समस्यांना तोंड दिले, नैसर्गिक आपत्तींनाही तोंड दिले, तरीही इतक्या कमी वेळात आपण 11 व्या वर्षी आपण चौथी मोठी अर्थव्यवस्था बनलो. कारण आपल्याला विकास हवा आहे, आपल्याला प्रगती हवी असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपला मुंबई दौरा आटोपता घेतला आहे. ते दिल्लीकडे रवाना होत असल्याची माहिती आहे. शाह हे माधवबाग येथील लक्ष्मीनारायण मंदीरात गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
नाशिक मुंबई महामार्गावर काही काळ वाहतूक बंद पडली होती.शहापूर तालुक्यातील नाशिक हून मुंबई कडे जाणाऱ्या नवीन कसारा घाटात मोठमोठी दगड पडले होते. महामार्ग पोलीस यांच्या मदतीने चालक व पोलीस कर्मचारी यांनी हाताने ढकलत पडलेली दरड बाजूला केली. आता वाहतूक सुरक्षित झाली आहे.
राज्यात दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने आज मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्राला ऑरेज ॲलर्ट दिला आहे. मुंबईतील लोकल सेवा पूवर्वत झाली आहे.
मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. तर काल पडलेल्या पावसानंतर मुंबईतील सध्या रस्ते वाहतूक सुरळीत झाली आहे. मात्र, रेल्वे वाहतूक अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. दरम्यान, काल वरळी येथील आचार्य अत्रे स्थानकात पाणी शिरल्याने भुयारी मेट्रो आज बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईला आज येलो अलर्ट देण्यात आल्यामुळे आज देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत हिंदी, इंग्रजीसह मराठीचा वापर आता बंधनकारक करण्याबाबतचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. या संबंधी सरकारने परिपत्रक जारी केलं आहे. शासनाच्या या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. केंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील सर्व कार्यालयात हिंदी, इंग्रजीसह मराठीचा वापर करण्याबाबतची कार्यालयांनी दर्शनी ठिकाणी सूचनाफलकावर लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील बजाज नगरमध्ये एका उद्योजकाच्या घरी दरोडा घालणाऱ्या संशयित आरोपीचा पोलिसांच्या गुन्हे शाखेने एन्काऊंटर केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांकडून अमोल खोतकर या संशयित गुन्हेगाराचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भयंकर अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे मृत्यू झालेले सहा जण अपघातातून बचावले होते. मात्र, डिव्हायडरमध्ये अडकलेली कार बाहेर काढताना या सर्वांवर काळाने घाला घातला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मंगळवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई विद्यापीठातील सर कावासजी जहांगीर हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाषण करणार आहेत. यावेळी ते माधवबाग मतदारसंघातील लक्ष्मी-नारायण मंदिराच्या 150 व्या उत्सवालाही उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.