High Court Clerk Exam Sarkarnama
महाराष्ट्र

High Court Clerk Exam : सर्व्हर डाऊन, अंधार अन् की-बोर्ड बंद; परीक्षार्थी संतापले, पोलिसांना पाचारण

Server Down, Candidates Wait as High Court Clerk Exam Faces Chaos : कल्याणमधील परीक्षा केंद्रावर तांत्रिक बिघाडांचा फटका; परीक्षा विलंबाने पुढील बॅचही ताटकळली, परीक्षार्थींनी अभिजीत दिपके यांना केला व्हिडिओ कॉल.

Pradeep Pendhare

Kalyan Exam Centre : नीट आणि टीएटीसह विविध स्पर्धा परीक्षांच्या आयोजनावरून आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, आता उच्च न्यायालयातील लिपिक पदाच्या परीक्षेतही तांत्रिक गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संतापलेल्या परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावरून थेट काॅक्रोच जनता पक्ष या उपहासात्मक आंदोलनाचे संस्थांपक अभिजीत दिपके यांना व्हिडिओ काॅल लावला.

रविवारी कल्याणमधील परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन, संगणकांचे की-बोर्ड बंद पडणे, परीक्षा कक्षात अंधार आणि निकालाची प्रिंट न निघणे अशा अनेक समस्यांमुळे परीक्षार्थींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. परिस्थिती चिघळल्याने परीक्षा केंद्रावर पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली.

उच्च न्यायालयातील (High Court) 800 लिपिक पदांसाठी रविवारी राज्यभरात परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या भरतीसाठी सुमारे 7 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील परीक्षा केंद्रावर सुमारे 500 परीक्षार्थींची परीक्षा तीन बॅचमध्ये घेण्यात येणार होती.

मात्र, परीक्षेला (Exam) सुरुवात होताच तांत्रिक अडचणींचा सामना परीक्षार्थींना करावा लागला. संगणकाधारित परीक्षा असल्याने सर्व्हर डाऊन झाल्याचा थेट परिणाम परीक्षा प्रक्रियेवर झाला. काही परीक्षा कक्षांमध्ये प्रकाशाचीही समस्या होती, तर काही संगणकांचे की-बोर्ड व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार परीक्षार्थींनी केली. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर निकाल आणि त्याची प्रिंट मिळण्यातही अडचणी आल्याचे सांगण्यात आले.

या गोंधळाचा परिणाम पुढील बॅचच्या परीक्षार्थींवरही झाला. पहिल्या बॅचची परीक्षा नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या बॅचमधील उमेदवारांना दुपारनंतर बराच वेळ परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत राहावे लागले. साडेतीन वाजेपर्यंतही अनेक परीक्षार्थी प्रतीक्षेत असल्याने संताप वाढत गेला.

गोंधळ वाढल्यानंतर परीक्षा केंद्रावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कल्याण न्यायालयातील न्यायाधीशांनाही परीक्षा केंद्रावर जावे लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या परीक्षेतील तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेतली जाणार का, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट आणि अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, राज्यातील इतर परीक्षा केंद्रांवरही अशाच प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्याच्या तक्रारी परीक्षार्थींनी केल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या लिपिक भरती परीक्षेच्या नियोजन आणि तांत्रिक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. नीट आणि टीएटी परीक्षांशी संबंधित वाद ताजे असतानाच पुन्हा एकदा परीक्षा आयोजनातील गोंधळामुळे परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अभिजीत दिपकेंना व्हिडिओ काॅल

परीक्षा दिलेल्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांना परीक्षा हाॅलमधून बाहेर जाऊ दिले जात नव्हते. बाहेर दुसरी बॅच हाॅलकडे जाण्यासाठी तयार होती. पण पोलिसांनी प्रवेशद्वारे लावून घेतल्याने पहिल्या बॅचच्या मुलांना खाली, तर दुसऱ्या बॅचच्या मुलांना परीक्षा हाॅलकडे जाता येत नसल्याने संतापले होते. यातून एका विद्यार्थ्याने थेट काॅक्रोच जनता पक्ष या उपहासात्मक आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दिपके यांना व्हिडिओ काॅल लावला. परीक्षार्थी हा काॅल पोलिसांकडे संवादासाठी देत होते. परंतु पोलिसांनी परीक्षार्थींना तुम्हीच बोला, असे सांगत असताना व्हिडिओ काॅलचा आवाज येत नव्हता, अशी माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT