Sharad Pawar, jayant Patil
Sharad Pawar, jayant Patil  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : '' फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी...''; जयंत पाटलांचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Jayant Patil On Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत असं खळबळजनक विधान केलं आहे. या विधानाचे पडसाद राजकीय क्षेत्रात उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडूनही आंबेडकरांच्या विधानाचा समाचार घेण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आंबेडकरांच्या टीकेवर प्रतिक्रिया देतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते असं खळबळजनक विधान पाटलांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँगेसचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, प्रकाश आंबेडकर सध्या उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करत असल्यानं विधान करण्याचा अधिकार राखून ठेवतो. मात्र, अजित पवार असं कुठं बोलले असतील असं वाटत नाही. तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पर्याय नसल्याने, ही खेळी असू शकते.

मात्र,अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं. राष्ट्रवादीत बंडखोरी झाली नाही. शिवसेनेचे आमदार गेल्याने सरकार कोसळलं. राष्ट्रवादीने शिवसेनेला शेवटपर्यंत साथ दिली असंही जयंत पाटील (Jayant Patil) यावेळी ते म्हणाले.

यावेळी आंबेकरांनी सत्तेची गरज शिवसेनेला नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची गरज होती या वक्तव्यावर भाष्य करताना पाटील यांनी भाष्य केलं. पाटील म्हणाले,शिवसेना आमच्याबरोबर आली, कारण त्यांना सत्तेची गरज होती. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो, कारण आम्हाला सत्तेची गरज होती. उलटपक्षी भाजपाला रोखण्याचं काम शरद पवारांनी केलं, याचं प्रकाश आंबेडकर कौतुक का करत नाही. ते जर भाजपाचे विरोधक असतील, तर त्यांनी पवारांचं स्वागत करायला हवं असंही पाटील म्हणाले.

आंबेडकर नेमकं काय म्हणाले होते?

प्रकाश आंबेडकरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांबाबतच माझं आधीपासूनचं मत कायम आहे. पवार हे आजही भाजपबरोबर आहेत. तुम्हाला लवकरच कळेल, तुम्ही डोळेझाक करून चालला आहात. माझ्यासाठी हे अजिबात धक्कादायक नाही असं विधान केलं होतं.

तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं असंही आंबेडकर म्हणाले होते.

आपल्याला महाविकासआघाडीसोबत युती करण्याची इच्छा नाही...

ठाकरे गटाशी युती केल्यानंतरच्या पत्रकार परिषेदत प्रकाश आंबेडकरांनी आत्ता आमची युती ठाकरे गटासोबत झाली आहे. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस लवकरच आमच्यासोबत येतील अशी आशा बाळगतो असं मत व्यक्त केलं होतं.

यावेळी ठाकरेंनी आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्यास कुणाची ना नाही असं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, आता काही तासांतच आंबेडकरांनी ठाकरेंचं टेन्शन वाढवणारं विधान केलं आहे. आपली युती ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे, महाविकासआघाडीसोबत नाही. आपल्याला महाविकासआघाडीसोबत युती करण्याची इच्छा नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT