NCP (Sharadchandra Pawar) leader Jitendra Awhad has raised questions over a viral video allegedly showing BJP candidate Kaustubh Gawade wearing a scarf bearing the lotus symbol while voting. Sarkarnama
महाराष्ट्र

BJP candidate news : मतदानादिवशीच भाजप उमेदवार अडचणीत? जितेंद्र आव्हांडाकडून व्हिडिओ पोस्ट, थेट निवडणूक आयोगाला सवाल

Jitendra Awhad, Kaustubh Gawade, Election Commission of India : नियमभंग आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करून त्याचा अहवाल सार्वजनिक केला जाणार का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Rajanand More

Maharashtra Legislative Council election : राज्यातील पाच शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान भाजप उमेदवाराने कमळ चिन्ह असलेल्या पंचा घालून मतदान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यावरून राजकारण तापले असून विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ पोस्ट करत निवडणूक आयोग झोपला आहे का?, असा सवाल उपस्थित केला आहे. व्हिडिओमध्ये पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे हे भाजपचे चिन्ह असलेला पंचा घालून मतदान करताना दिसत आहेत. त्यावर आव्हाड यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत.

आव्हाड यांनी म्हटले आहे की, निवडणूक नियम सामान्यांसाठीच आहेत का? लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 चे कलम 130 आणि निवडणूक आयोगाचे निर्देश याबाबत आयोगाने स्पष्ट उत्तर द्यावे. मतदान केंद्राच्या आत भाजपचे कमळ चिन्ह असलेला पंचा परिधान करण्यास परवानगी कोणी दिली? मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी ही बाब पाहिली का? पाहिली असेल तर त्यांनी काय कारवाई केली?

निवडणूक आयोगाचे निर्देश सामान्य मतदारांसाठी आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांसाठी वेगवेगळे आहेत का? घटनेची अधिकृत चौकशी करून संबंधित निर्देशांचे उल्लंघन झाले आहे की नाही, हे आयोग जाहीर करणार का? नियमभंग आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करून त्याचा अहवाल सार्वजनिक केला जाणार का, असे सवाल आव्हाड यांनी केले आहेत.

निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावे, लोकशाहीत कोणताही पक्ष कायद्यापेक्षा मोठा नाही,आधीच देशभर आपल्या अब्रूची लक्तरे पार वेशीवर टांगली आहेत,उरली सुरली अब्रू किमान हाताने तरी झाकण्याचा प्रयत्न करा, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT