Shiv Sena leaders and workers celebrate after Kamal Shelkande was elected chairperson and Amit Dhole deputy chairperson of Junnar Panchayat Samiti. Sarkarnama
महाराष्ट्र

ShivSena UBT News : थेट 'मातोश्री'वरून आलेला आदेश डावलला; ठाकरेंच्या शिवसेनेचा सदस्य फुटला, एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा राष्ट्रवादी-भाजपला दणका

Junnar Panchayat Samiti Election : जुन्नर पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या कमल शेळकंदे यांची निवड झाली. उद्धव ठाकरे गटाचे अमित ढोले यांनी मातोश्रीचा आदेश डावलत शिंदे गटाला साथ दिल्याने राजकीय चर्चा रंगल्या.

सरकारनामा ब्यूरो

Junnar Political News : जुन्नर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या कमल बाळासाहेब शेळकंदे यांची तर उपसभापतीपदी शिवसेना उबाठा गटाचे अमित अनंता ढोले यांची निवड झाली. सभापती व उपसभापती पदासाठी सोमवार (ता. 9) पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात निवडीची प्रक्रिया पार पडली. शेळकंदे यांच्या निवडीने पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला असून आमदार शरद सोनवणे यांना पंचायत समितीची सत्ता शिवसेना पक्षाकडे ठेवण्यात यश आले. निवडणुकीचा निकाल लागताच शिवसैनिकांनी पंचायत समितीच्या आवारात गुलाल उधळत फटाके वाजवत जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला.

जुन्नर तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. एकूण 16 सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे 8, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6 तर शिवसेना उबाठा व भाजप यांचे प्रत्येकी एक सदस्य विजयी झाले होते. सभापती पद हे अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी राखीव होते. या प्रवर्गातील शिवसेनेचे एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 सदस्य विजयी झाले होते.

सदस्यांची संख्या विचारात घेता आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा सभापती होईल अशी अटकळ बांधली जात होती तर माजी आमदार अतुल बेनके यांच्याकडून राजकीय खेळी करत राष्ट्रवादीच्या पारड्यात सभापती पद पाडले जाईल तर भाजपचे एकमेव सदस्य असलेले संजय वऱ्हाडी यांना उपसभापती पदाची संधी देऊन आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाकडून केला जात होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

तसेच आमदार सचिन अहिर यांनी थेट मातोश्रीवरून निरोप आणून या निवडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार नसल्याचे सुतोवाच केले होते. तरी देखील अमित ढोले यांनी वरिष्ठांचा संदेश न जुमानता शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ढोले यांच्या या निर्णयाची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर ढोले यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिवसेना उबाठा पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पंचायत समितीच्या आवारात पाहावयास मिळाले. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी युवा नेते विकी पारखे यांची पोलिसांनी समजूत काढत त्यांना पंचायत समितीच्या आवारातून निघून जाण्यास भाग पाडले.

दरम्यान, सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे सर्व सदस्यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितरित्या पंचायत समितीमध्ये सकाळी 11 वाजता प्रवेश केला. यावेळी तालुका अध्यक्ष योगेश पाटे, माऊली खंडागळे, प्रसन्ना डोके, सचिन वाळुंज यांसह शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सभापती पदासाठी शिवसेनेकडून कमल बाळासाहेब शेळकंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आशा कैलास डावखर यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आला.

यावेळी हात वर करून मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी शेळकंदे यांना नऊ तर डावखर यांना सात मते पडली. तर उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून अमित अनंता ढोले तर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपकडून संजय सुरेश वऱ्हाडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडीत ढोले यांना नऊ तर वऱ्हाडी यांना सात मते मिळाली. ढोले यांची निवड यावेळी जाहीर करण्यात आली. निवडणुकीची प्रक्रिया साडे बारा वाजता पूर्ण झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT