Loksabha Election 2024 News : शिवसेनेत उभी फूट पडून एकनाथ शिंदे यांनी अगोदर स्वतंत्र गट निर्माण करत, भाजपशी हात मिळवणी केली. त्यानंतर शिवसेना पक्षही ताब्यात घेतला. त्यापाठोपाठ अजित पवारांनीही शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि महायुतीत सामील झाले.
त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा भाजपशी हातमिळवणी करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकूण सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदललं आहे. मात्र, आता भाजपसोबत गेलेल्या पक्षांना लोकसभेच्या जागांसाठी चांगलीच घासाघीस करावी लागत आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी एका पोस्टद्वारे निशाणा साधला आहे.
किरण माने म्हणतात, 'उद्धवजींच्या लोकप्रियतेचं गमक हे आहे की, त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं 'कॉ पेस्ट' नाही केले! स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून ते जनतेसमोर आले. स्वत:च्या ओरिजीनल शैली महत्त्वाची मानली. स्वत:चा म्हणून एक विचार जपला.
समजा एखादा अभिनेता महान आहे... जागतिक दर्जाचा आहे. म्हणून तो गेल्यानंतर त्याच्यासाठी लिहिलेली भूमिका त्याची उत्तम मिमिक्री करणार्याला, हुबेहूब त्याच्यासारख्या दिसणार्या कलाकाराला कधीही देत नाहीत. त्याच्या गुणवत्तेची बरोबरी असेल अशा स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या अभिनेत्याला ती भूमिका मिळते.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'उद्धवजींनी ठरवलं असतं तर बाळासाहेबांचं नांव 'कॅश' करणं अवघड नव्हतं. साक्षात मुलगा आहे तो त्यांचा. "माझ्या उद्धवला सांभाळा" ही बाळासाहेबांची साद आजही मराठी माणसाच्या काळजावर कोरलेली आहे. तरीही उद्धवजींनी काळाची पावलं ओळखून प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचं बोट धरलं. तिथंच ते जिंकले. आज बाळासाहेब असते तरी आजच्या अत्यंत नासलेल्या, सडलेल्या, विषारी भवतालात त्यांनी हेच केलं असतं.'
'आपण नेहमी म्हणतो बघा. 'आज पु.ल., निळूभाऊ, श्रीराम लागू असते तर पुरोगामी विचार मांडल्यावर खूप ट्रोल झाले असते.' ....तसंच आज जे बाळासाहेबांचं नांव 'वापरून' त्यांचा फायदा घेऊ पाहताहेत, त्यांनीही बाळासाहेब हयात असते तर त्यांची तमा ठेवली नसती हे कटू सत्य आहे ! हे लोक ईडीला आणि दडपशाहीला घाबरून बाळासाहेबांना सोडून गेले असते आणि बाळासाहेबांवरही हेच हिंदुत्व सोडल्याचे आरोप केले असते.
बाळासाहेबांनीही आज वर्चस्ववाद्यांना राक्षसी फायदा होईल अशी धार्मिकता टाळली असती. या कपटी कावेबाजांना कधीच दूर केले असते. त्यांनी कायम त्या-त्या भवतालानुसार आवश्यक त्या भूमिका घेतल्या. त्या स्वबळावर पेलल्या. कुणाच्याही नावाचा आधार न घेता लढले. तेच आज उद्धवजी करताहेत, म्हणून ते जनमानसाच्या हृदयात आहेत.'
'आज राजकारणात युती-आघाडी करावी लागणं ही काळाची गरज असते, पण ती करताना उद्धवजींनी कधी लाचारी पत्करली नाही. बाळासाहेबांचंही हिंदुत्व लाचार हतबल नव्हतं. पवारसाहेब, राहुल, सोनियाजी यांच्या बरोबरीने उद्धवजींच्या मताला किंमत असते. स्थानिक काँग्रेसचा दबाव असून, सांगलीची जागा शिवसेनेला मिळणं ही त्यांच्या ताकदीची पावती आहे. तसेच कोल्हापूरला काँग्रेसच्या जागेचा यथोचित आदर करणं हे त्यांच्या नितळ मनाचं लक्षण आहे. देशपातळीवरही इंडिया आघाडीच्या मीटिंग्जमध्ये उद्धवजींच्या शब्दाला वजन असते.'
'आत्ता सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता पाहून कळतंय की उद्धवजींनी केलं ते योग्यच केलं. 'जिथं आपल्या शब्दाला किंमत नाही तिथं लाथ घालायची', हा स्वाभिमानी बाणा तर बाळासाहेबांचा ! तो उद्धवजींमध्ये आहे म्हणून सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना लाभतंय.
कुणी कितीही आपटा... तो त्याच्या बापाचं नाव लावतो, उसन्या बापाची गरज नाही त्याला. 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाम ही काफी है ! ईषय कट.' असं म्हणत किरण माने यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.