Vaibhav Naik
Vaibhav Naik Sarkarnama
कोकण

Konkan News : एसीबी शिवसेना आमदाराच्या पाठीशी हात धुवून लागली : निधी दिलेल्या गावचे सरपंच-ठेकेदाराचीही चौकशी

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : शिवसेनेचे (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या मागे सध्या एसीबी (ACB लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) हात धुवून लागल्याचे दिसून येत आहे. कारण, नाईक यांनी आमदार निधीतून विकास कामांसाठी ज्या गावांना निधी वाटप करण्यात आला आहे, त्या गावचे सरपंच आणि संबंधित ठेकेदाराचीही चौकशी एसीबीने सुरू केली आहे. (ACB probes village sarpanch and contractor funded by MLA Vaibhav Naik)

आमदार वैभव नाईक यांची सध्या मालमत्ता प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार नाईक यांच्या मतदारसंघातील भरणीचे सरपंच आणि ठेकेदार यांची रत्नागिरीतील लाच लुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे चौकशी करण्यात आली. आमदार नाईक यांच्या आमदार फंडातून ज्या कामांना निधी देण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात आली आहे.

कुडाळ तालुक्यातील भरणी ग्रामपंचायतीमध्ये नाईक यांच्या आमदार फंडातून ज्या कामांना निधी वितरित करण्यात आला होता, त्या झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी भरणीच्या विद्यमान सरपंच अश्विनी मिस्त्री यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून रत्नागिरी येथे चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीदरम्यान श्रीमती अश्विनी मिस्त्री यांनी त्यांच्याकडे मागितलेली सर्व कागदपत्रे सादर केली.

भरणी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील देवूळवाडी येथे आमदार नाईक यांच्या आमदार फंडातून झालेल्या नळ योजना विस्तारीकरण कामाची वर्क ऑर्डर, काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागाकडून मिळालेली मोबदला रक्कम, ज्या बँकेच्या खात्याद्वारे प्राप्त झाली, त्याचे खाते उताऱ्यासह अन्य महत्वाची कागदपत्रे घेऊन बोलावण्यात आले होते. याच संबंधातील अन्य दोन ठेकेदारानाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या सर्वांची अर्धा तास चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT