Raigad Crime News : नवी मुंबई आणि रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलिबाग आणि उरण येथे दोन स्वतंत्र कारवाया करत एकाच वेळी पाच जणांना ताब्यात घेतले. महसूल विभागाशी संबंधित कामे करून देण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवालाने लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात एका मदतनीसालाही अटक करण्यात आली आहे. एकाच दिवशी झालेल्या या कारवायांमुळे जिल्ह्याच्या महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
महसूल विभागाशी संबंधित कामे करून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी मंगळवारी (६ ऑक्टोबर) एसीबीने सापळा रचून दोन स्वतंत्र कारवाया केल्या. नवी मुंबई आणि रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कारवाया करत महसूल विभागातील पाच सरकारी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाया अलिबाग आणि उरण येथे करण्यात आल्या.
पहिली कारवाई
पहिली कारवाई अलिबाग तालुक्यातील थळ येथे करण्यात आली. येथे जमीन भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जावरून काम करून देण्यासाठी तलाठी अमृत चौगुले याने एक हजार रुपयांची लाच मागितली होती. याविरोधात तक्रारदाराने रायगड एसीबीकडे तक्रार केली होती.
तलाठ्यासह कोतवालाला बेड्या
या तक्रारीवरून रायगड एसीबीच्या उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या पथकाने थळ येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. तेथे एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी अमृत चौगुले याला रंगेहात पकडण्यात आले. अमृत चौगुले याच्यासह असलेला कोतवाल बंड्या ऊर्फ जितेंद्र पाटील यालाही एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. दोघांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई
उरण तालुक्यातील चिरनेर येथे दुसरी कारवाई करण्यात आली असून, सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका शेतकऱ्याने सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. ही नोंद करून देण्यासाठी कोप्रोली मंडळ अधिकारी केशव मोहिते यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी शेतकऱ्याने नवी मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची पडताळणी पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांनी केल्यानंतर चिरनेर येथील तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम कार्यालयातील मदतनीस मोनिका पाटील यांनी स्वीकारली. ती रक्कम मंडळ अधिकारी केशव मोहिते यांच्याकडे देत असतानाच एसीबीच्या पथकाने धाड टाकून दोघांना रंगेहात पकडले. यावेळी चिरनेरचे तलाठी जयहिंद कोळी यांनाही लाच देण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यात एकीकडे दुष्काळाची स्थिती असताना आणि शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना सरकारी अधिकारी अशा पद्धतीने लाखाची लाच मागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. जिल्ह्यात झालेल्या दोन कारवायांमुळे महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.