Raigad Political Attack News : रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुरू झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. तोच नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडल्यानंतरही शिवसेना नेत्यांचा राजकीय राग तटकरेंविरोधात उफाळून आला आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी तर तटकरेंच्या विरोधात मोर्चाच उघडलेला दिसत असून, ते सतत टीका करत आहेत.
दळवी यांनी तटकरेंवर टीका करताना लोकसभेवर दावा करत, आगामी खासदार आमचाच असेल, असा इशारा दिला होता. तर आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर देखील घणाघाती टीका करत, त्यांचा राजकारणातील 'सरोगसी बाळ' असा उल्लेख करत टोला लगावला होता. या टीकेला आता आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दळवी काय बोलतात, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्यांतून त्यांची संस्कृती दिसून येते, असा पलटवार अनिकेत तटकरे यांनी केला आहे.
दळवींना उठता-बसता, चहा घेताना, दुपारी जेवताना आणि झोपतानाही तटकरे दिसतात. आम्ही जर संपलेलो असू, तर त्यांना वारंवार तटकरे यांचं नाव घेण्याची गरज काय? असा सवाल अनिकेत तटकरे यांनी केला आहे. तर कुठेतरी त्यांना तटकरे यांची भीती वाटते. यामुळेच निवडणूक आली की त्यांना तटकरे आठवतात आणि निवडणूक संपली की ते विसरून जातात, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दळवी यांनी अनिकेत तटकरे यांच्यासाठी वापरलेल्या ‘सरोगशी बाळ’ या शब्दावरून देखील त्यांनी जोरदार पलटवार करत, दळवी हे दोन टर्म आमदार आहेत. त्यांनी ‘सरोगशी बाळ’ या शब्दाचा अर्थ लिहून दाखवावा किंवा आम्हाला समजावून सांगावा, असं आव्हानही अनिकेत तटकरे यांनी दळवींना दिलं आहे.
याचवेळी दळवी यांच्या बैलांचे बादशहा या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना, ते बैलांचे बादशहा आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? असा खोचक टोला लगावला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात महेंद्र दळवी यांनी तटकरे साहेबांची मुंबई आणि दिल्लीत किती वेळा भेट घेतली, याचं त्यांनी खंडन करावं आणि याबाबत आत्मपरीक्षण करावं, असेही तटकरे यांनी म्हटलं आहे.
पालकमंत्रीपदाच्या श्रेयावरूनही टोला
रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरूनही अनिकेत तटकरेंनी महेंद्र दळवींवर निशाणा साधला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली होती. त्या चर्चेत सुनील तटकरे साहेबही होते. त्यावेळी हे महाशय कुठे होते? तटकरे साहेबांनी पालकमंत्रीपदाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. मात्र, त्याच्या पोटात का दुखतंय, हे माहीत नाही, असंही अनिकेत तटकरे यांनी म्हटलं आहे. तर सतत होणाऱ्या टीकेवरून, आम्हाला कामं असून दळवी रिकामटेकडे आहेत, अशी घणाघाती टीकाही अनिकेत तटकरे यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीची तयारी
राज्य आणि देशातील लोकसभा निवडणुकीतील उमेदवार जर दळवी ठरवत असतील, तर ते खूप मोठे नेते आहेत. मग नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीही इथे आलं पाहिजे, असा उपरोधिक टोला अनिकेत तटकरे यांनी महेंद्र दळवींना लगावला आहे. दळवींनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांबाबत तटकरेंना थेट इशारा देत, आमच्याकडे देखील इच्छुक असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्यानंतर रायगडच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी तटकरे पिता-पुत्रावर तुटून पडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. तर आलेला प्रत्येक वार तटकरे परतवून लावताना दिसत आहेत. यामुळे राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद विकोपाला जाताना दिसत असून, महायुतीतील राजकीय मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.