Bhiwandi News : शहरातील गंभीर प्रश्नांवर महासभेत चर्चा सुरू असतानाच एका महिला नगरसेविकेचा वेगळाच प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सभागृहात प्रॉपर्टी टॅक्स आणि धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर चर्चा सुरू असतानाच संबंधित महिला नगरसेविका मोबाईलवर चक्क ‘कँडी क्रश’ गेम खेळताना दिसून आली. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गंभीर विषयांवर चर्चा सुरू अन् मोबाईलवर गेम
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महासभेत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू होती. विशेषतः कोहिनूर इमारत दुर्घटनेनंतर धोकादायक इमारती आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत होता. याचवेळी एका महिला नगरसेविकेच्या मोबाईलवर ‘कँडी क्रश’ गेम सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
बुरखा असल्याने नगरसेविका कोण, हे स्पष्ट नाही
संबंधित महिला नगरसेविकेने बुरखा परिधान केला असल्याने व्हिडिओतील व्यक्ती नेमकी कोण आहे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे संबंधित नगरसेविकेचे नाव निश्चितपणे समोर आलेले नाही.
‘महासभेत गेम खेळणे चुकीचे’
कोणार्क विकास आघाडीचे नगरसेवक विलास पाटील यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महासभेत शहरातील गंभीर प्रश्नांवर चर्चा होत असताना अशा पद्धतीने मोबाईलवर गेम खेळणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
‘पीडितांना मदत मिळवून देण्यावर चर्चा अपेक्षित’
कोहिनूर इमारत दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर, पीडितांना शासनाकडून अधिकाधिक मदत कशी मिळवून देता येईल, यावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, अशा गंभीर विषयांवर चर्चा सुरू असताना नगरसेवक गेम खेळत असल्याचे समोर येणे दुर्दैवी असल्याचे पाटील यांनी सांगितले.
‘नागरिकांचे प्रश्न कसे सुटणार?’
महासभेत शहराच्या मूलभूत प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करून त्यावर उपाययोजना करणे अपेक्षित असते. मात्र, लोकप्रतिनिधी सभागृहातच गेम खेळत असतील, तर नागरिकांच्या समस्या कशा दूर होणार, असा सवाल या प्रकारानंतर उपस्थित केला जात आहे. भविष्यात कोणत्याही नगरसेवकाने महासभेत अशा प्रकारचे वर्तन करू नये, अशी अपेक्षाही विलास पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.