Rajan Teli-Deepak Kesarkar
Rajan Teli-Deepak Kesarkar Sarkarnama
कोकण

Konkan News केसरकर, तुम्ही गुर्मीत राहू नका; एकदाच काय ते होऊन जाऊ दे : भाजप जिल्हाध्यक्षांचे खुले आव्हान

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : माझा दोनदा पराभव झाला असला तरी २०१९ च्या निवडणुकीत पक्षाचा एबी फॉर्म असता तर परिस्थिती वेगळीच असती. पराभव तर इंदिरा गांधींचाही झाला होता. त्यामुळे दीपक केसरकर तुम्ही गुर्मीत राहू नका. युतीची भाषा करण्यापेक्षा येथे स्पेशल केस म्हणून मैत्रीपूर्ण लढा. एकदाच काय ते होऊन जाऊ दे, असे खुले आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिले. (BJP district president Rajan Teli's open challenge to Deepak Kesarkar)

बांधकाम मंत्री भाजपचे असताना मंत्री केसरकर त्यांनाच आव्हान देत राजकारण सोडण्याची भाषा करतात. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलताना केसरकर यांनी सरकारमध्ये त्यांचे वजन का आहे? याचा आधी विचार करावा आणि कुठलेही विधान करताना सांभाळून करावे, असा इशाराही श्री. तेली यांनी दिला.

आमदारकीसाठी तेलींकडून युतीत वादाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप श्री. केसरकर यांनी केला होता. यावर श्री. तेली यांनी आज प्रत्त्युतर दिले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

तेली म्हणाले, ‘‘भाजपचे नेते चव्हाण यांच्या माध्यमातून सावंतवाडी मतदारसंघात विकास सुरु आहे. त्यांनी आपल्या कोट्यातील २४ टक्के निधी शिवसेनला दिला; मात्र केसरकर पालकमंत्री असताना भाजपला किती निधी दिला, तो त्यांनी जाहीर करावा. १९९०-९१ पासून ताज ग्रुपची जागा तसेच 'सिदा दी गोवा'ची जागा पडून आहे. तुम्ही आमदार व मंत्री होता, मग इथे काहीही का होऊ शकले नाही? नारायण राणे उद्योगमंत्री असताना आडाळी एमआयडीसी मंजूर केली. त्या ठिकाणी तुमच्या काळात एकही उद्योग का येऊ शकला नाही? बंद टाटा मेटॅलिक का सुरु झाले नाही? सातार्डा येथील उत्तम स्टीलचे काय झाले? आता कोणाला तरी हॅलिकॉप्टरमध्ये फिरवून लोकांची दिशाभूल का चालवली आहे.’’

ते म्हणाले, ‘‘तुमची ताकद होती तर मतदारसंघातील वेंगुर्ले, सावंतवाडीसह दोडामार्ग पालिका भाजपने कशी जिंकली? मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्वाधिक जागा भाजपच्या ताब्यात आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायतवर देखील भाजपचीच सत्ता आहे. सहकारातही आमचेच वर्चस्व आहे. तर मग विधानसभेच्या जागेवर हक्क कसला सांगता? पर्यटनाच्या माध्यमातून आंबोली, चौकुळ, गेळे त्याचप्रमाणे किनारपट्टीच्या भागाचा विकास व्हावा, त्याचप्रमाणे आडाळी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.’’

सावंतवाडी मतदारसंघात युती न करता जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिकेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढवूया. ज्याच प्राबल्य येईल, त्याला संधी द्यावी. तुम्ही जिंकलात तर मी बाजूला होतो; अन्यथा तुम्ही बाजूला व्हा, असेही राजन तेली यांनी केसरकरांना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT