कोकण

जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण? निवडीच्या 24 तास आधी नाराज तेली राणेंच्या भेटीला

राजन तेली (Rajan Teli) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) भाजपचा (BJP) विजय झाला आहे पण भाजपचे जिल्हाध्यक्ष व पॅनेलप्रमुख राजन तेली (Rajan Teli) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. यामुळे तेली यांनी तडकाफडकी पक्ष नेतृत्वाकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला होता. आज तेली यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पराभवाचा धक्का बसताच राजन तेलींनी तडकाफडकी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तेलींची मनधरणी करण्याचा भाजप नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तेलींनी आज नारायण राणेंची सिंधुदुर्गमध्ये भेट घेतली होती. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड उद्या (ता.13) होत आहे. यामुळे आजच नाराज तेलींनी राणेंची भेट घेणे महत्वपूर्ण आहे. जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असून, उद्याच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

या भेटीनंतर बोलताना तेली म्हणाले की, मी भाजपच्या कोणत्याही नेत्यावर नाराज नाही आणि यापुढेही असणार नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या महिनाभर आधीच मी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी पक्षाकडे केली होती. त्यामुळे नाराजीचा कोणताही मुद्दा नसून, त्यातून वेगळे अर्थ काढू नयेत. जिल्हा बँक अध्यक्ष निवड उद्या असून, राणे देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल.

जिल्हा बँकेत नारायण राणे यांच्या सिद्धीविनायक पॅनेलचे 11 उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीला (MVA) 8 जागा मिळाल्या. या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघात राजन तेलींना पराभूत करून सुशांत नाईक विजयी झाले आहेत. सुशांत नाईक हे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत.

आमदार वैभव नाईक यांनीच विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे राणे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या तेली यांचा पराभव हा पुन्हा नाईक यांनी दिलेला आणखी एक धक्का मानला जात आहे. तेली यांच्या नशिबात जिल्हा बँक नसल्याचे या निकालातून समोर आले होते. याआधी ते दोनदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. आता त्यांनी पराभवाची हॅटट्रिक केली आहे. राणे यांना तेली यांच्या पराभवामुळे मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT