सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची जामिनावर सुटका झाली असून, ते आज सिंधुदुर्गमध्ये पोचले आहेत. प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजच त्य़ांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. सिंधुदुर्गमध्ये पोचल्यानंतर राणेंनी अटक झालीच नव्हती, असा दावा करुन खळबळ उडवून दिली आहे. (Nitesh Rane Health Updates)
राणे म्हणाले की, पोलीस आणि तपास अधिकाऱ्यांना मदत करत होतो. यापुढेही मदत करीत राहीन. न्यायालयाने लागू केलेल्या अटी आणि शर्तींचे पालन मी करेन. तपास अधिकारी बोलावतील त्यावेळी मी चौकशीला हजर होणार आहे. मी कुठेही निघून गेले नव्हते. प्रत्येक वेळी बोलावल्यानंतर मी चौकशीला सामोरे गेलो होतो. माझ्याकडे असलेली सगळी माहिती पोलिसांनी दिली आहे. यापुढेही काही माहिती असल्यास ती देत राहीन. मी विधिमंडळाचा सदस्य आहे. मी दोन वेळा निवडून आलोय. त्यामुळे जबाबदारीने वागणे मला कळते. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी सहकार्य करीत होतो. पळण्याचा प्रश्नच नव्हता.
मी स्वत:हून शरण आलो. मी शरण आलो त्यादिवशी अजून 4 दिवस मला सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण होते. त्याआधी एक दिवस आधी न्यायालयाबाहेर गाडी अडवली. जो प्रकार घडला. माझ्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना त्रास खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. सिंधुदुर्गातील जनतेला माझ्यामुळे त्रास नको. म्हणून कुटुंबीयांशी आणि मी वकिलांसोबत चर्चा करून शरण गेलो. मला अटक झालेली नाही. या सरकारने मला अटक केलेली नाही. मला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली आणि नंतर मी न्यायालयीन कोठडीत गेलो, असे राणे यांनी सांगितले.
माझ्या तब्येतीबद्दल वेगवेगळी चर्चा करण्यात आली. मला आजही त्रास होतोय.कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मी माझ्या एसएसपीएम मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवस दाखल होणार आहे. त्यानंतर काही दिवस मी चाचण्यांसाठी मुंबईला जाणार आहे. मला पाठीचा आणि मणक्याचा त्रास आधीही होता. आता तो वाढलेला आहे. रक्तदाबाचा त्रास असून, साखर कमी होतेय. राजकीय आजाराचा माझ्यावर आरोप होत होता. न्यायालयीन कोठडी असल्यामुळे रुग्णालयात जाऊन बसला आहे, असे म्हणत होते. मी खोटे बोलत असेन पण माझ्या चाचण्या तर खोट्या बोलत नाहीत, असेही राणेंनी स्पष्ट केले.
नितेश राणेंच्या छातीत दुखत असल्याने आणि मणक्याचा त्रास असल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरला हलवण्यात आले होते. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयातील हृदयरोग विभागात उपचार सुरू होते. राणेंचा त्रास आणखी वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. या पथकात हृदयरोगतज्ञ आणि अस्थिरोगतज्ञांचा समावेश आहे. त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्यामुळे अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार होती. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज तातडीने नितेश राणेंना रुग्णालयाचून डिस्चार्ज घेतला.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या नितेश राणेंनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे हृदयरोगतज्ञ नसल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना 7 फेब्रुवारीला रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला हलवण्यात आले. राणेंना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली मागील काही दिवसांपासून सुरू होत्या.
पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. राणेंच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अखेर न्यायालयाने राणेंना जामीन मंजूर केला आहे. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नंतर प्रकटले होते आणि काही दिवस कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते. (Nitesh Rane News)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.