उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सिंधुदुर्ग दौऱ्यात निलेश राणेंना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
तळकोकणात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष वाढत असताना हा दौरा महत्वाचा ठरला आहे.
रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यांवर निलेश राणेंनी पलटवार करत शिवसेनेवर वार करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला.
Sindhudurg News : तळकोकणात भाजप आणि शिवसेनेत वाद विकोपाला गेला असतानाच आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत आमदार निलेश राणेंच्या मागे आपल्यासह शिवसेनेची पूर्ण ताकद असल्याचे सांगितले. तर राज्यात १ नंबर आम्हीच म्हणणार्या रवींद्र चव्हाण यांच्यावर निलेश राणेंनी पलटवार करताना थेट इशारा दिला असून शिवसेनेवर वार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा दम भरला आहे.
जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदेंची सभा झाली यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, दीपक केसरकर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी भाजपसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अंगावर घेणार्या आमदार निलेश राणे यांचे कौतुक केले.
त्यांनी, शिंदे साहेबांना मी सोडलं तर देव मला माफ करणार नाही, या निलेश राणेंच्या वक्तव्याचा धागा पकडत, पोटात एक आणि ओठात एक हे मला जमत नाही. जो काम करतो त्याच्या पाठिशी उभा राहणारा हा एकनाथ शिंदे आहे.
यामुळे निलेश राणे हे घाबरणारे नसून त्यांना नारायण राणेंचे बाळकडू मिळाले आहे. तर हा शिंदे डॉक्टर नसला तरी अनेक ऑपरेशन केली आहेत. आता तर बाळासाहेबांच्या ओरिजनल शिवसेनेत निलेश राणे आला आहे.
यामुळे आता फटाके 3 तारखेसाठी ठेवा. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणेच करेगा, कुणी कितीही करा कल्ला मालवण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे म्हणत शिंदेंनी वादाच्या काळात निलेश राणेंना दहा हत्तींचे बळ दिले आहे.
यावेळी निलेश राणे यांनी, शिवसेनेवर ज्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर एक नाही दोन वार आपण काढलेत. मात्र, पक्षावर वार होऊ दिला नाही. आणि आताही शिवसेनेवर वार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा नाव न घेता रवींद्र चव्हाण आणि भाजपच्या नेत्यांना दिला आहे.
तसेच त्यांनी शिंदे यांनी आपल्याला तिकीट दिले असून त्यांनी जीवंत केलं आहे. गेली 10 वर्ष मी कुठेतरी फेकला गेलो होतो. मला कोणी किंमत देत नव्हतं. अनेक जन फक्त तिकीट देतो म्हणत होते आणि वेळ आली की नजर चुकवून जात होते. मात्र 10 वर्षानंतर संधी दिली ती एकनाथ शिंदे यांनी. तेही निलेश तुला तिकीट देणार सांगूण, असे सांगणारे आणि तिकीट देणारे ते एकमेव आहेत.
यामुळे त्यांना सोडून जाणार नाही. तसे केल्या मला देवही माफ करणार नाही. तर आता आम्हाला येथील बॅकलॉग भरून काढायचा असून त्यासाठी तुम्ही मदत करावी असे आवाहन निलेश राणे यांनी केले.
तसेच त्यांनी, ज्यांनी शिवसेनेवर वार करायचा प्रयत्न केला त्याच्यावर एक नाही दोन वार केले असून आता शिवसेना उत्तर देईल. आता किती जरी शिवसेनेवर टीका झाली, आपल्याबद्दल काहीही बोललं गेलं तरी 3 तारखेला समोरच्यांचे टांगे पलटी होणारच आणि शिवसेनाचं जिंकणार हा शब्द देतोय, असेही निलेश राणेंनी म्हटले आहे.
दरम्यान त्यांनी दोन नंबर हा दोन नंबरचा राहणार या रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेतला असून कोड्यात बोलण्यापेक्षा स्पष्ट बोला असा हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी दिलेला दाखला हा स्वर्गीय आर आर पाटलांचा असून त्यांना आता राष्ट्रवादीवाले आठवायला लागले आहे. यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यामधील अनेक बदलांमध्ये एक वेगळा बदल नव्याने समोर आल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
त्यांनी सांगितले की निलेश राणेंच्या मागे त्यांच्यासह संपूर्ण शिवसेना ताकदीनिशी उभी आहे.
परस्पर आरोप-प्रत्यारोप, स्थानिक पातळीवरील तणाव आणि नेत्यांमधील संघर्ष यामुळे वाद तीव्र झाला आहे.
त्यांनी पलटवार करत सांगितले की शिवसेनेवर वार करणाऱ्यांना सोडणार नाही.
हा दौरा शिवसेनेच्या अंतर्गत ऐक्याचे आणि निलेश राणेंना दिलेल्या समर्थनाचे प्रदर्शन मानला जातो.
महायुती संघटनांमध्ये तणाव वाढू शकतो आणि कोकणातील आगामी निवडणुकांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.