Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sarkarnama
कोकण

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचा पुतळा आता पडणारच नाही! फडणवीस सरकारने 'ऑस्ट्रेलियन' कंपनीकडून केली खात्री

Chhatrapati Shivaji Maharaj News : मालवण राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे.

Hrishikesh Nalagune

Chhatrapati Shivaji Maharaj News : मालवण राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत पुतळा क्लिनिंग तसेच ग्रॅनाईट बसवण्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा नवा पुतळा 200 किलोमीटर वाऱ्याच्या वेगाला सहज तोंड देईल, असा बनविण्यात आला असल्याचा दावा आहे.

नौसेना दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 ला मेढा येथील राजकोट किल्ल्याची किल्ल्याची पुनर्बांधणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पणही केले होते. पण अवघ्या आठ महिन्यात वाऱ्याच्या वेगाने तो कोसळला होता. या दुर्घटनेनंतर राज्याने याच ठिकाणी नव्याने पुतळा उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.

या पुतळ्याच्या कामासाठी 31 कोटी 75 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड गाझीपुर उत्तर प्रदेश यांना पुतळा उभारणीचे काम देण्यात आले. यापूर्वीचा पुतळा हा जमिनीपासून चाळीस फूट उंचीचा होता. मात्र, आता नव्याने साकारण्यात येत असलेला शिव पुतळा जमिनीपासून 93 फूट उंचीचा असणार आहे. त्याची दहा वर्षे देखभाल, दुरुस्ती राम सुतार आर्ट क्रिएशनकडे असणार आहे.

'ऑस्ट्रेलियन' कंपनीकडून करून घेतली खात्री!

पुतळा कोसळल्यानंतर मालवण समुद्रकिनाऱ्यावर ताशी 140 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचे कारण देण्यात आले होते. त्यानुसार आता नवीन पुतळा बसवताना शासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पुतळा बसविण्याचे काम सुरू करण्यापूर्वी सुतार यांनी येथील भौगोलिक परिस्थिती जाणून घेतली. राजकोट किल्ल्यावरील वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन त्यांनी प्रथम अडीच फूट उंचीचा पुतळा तयार करून घेतला.

हा अडीच फुटांचा पुतळा ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आला. तिथे असलेल्या व्हिंटेज कंपनीने पुतळा वाऱ्याच्या वेगाला कशाप्रकारे प्रतिसाद देईल याची चाचपणी केली. या पुतळ्यावर ताशी 200 किलोमीटर वेगाने वारे सोडण्यात आले. त्या वाऱ्यावर पुतळा मजबुतीने उभा राहिला. तसे ना हरकत प्रमाणपत्र व्हिंटेज कंपनीने शासनाला दिले. त्यानंतरच या पुतळ्या बसवण्याच्या कामास सुतार यांच्या कंपनीकडून सुरुवात करण्यात आली.

याशिवाय सध्या सुरू असलेल्या कामाची स्वतंत्र 'गुणवत्ता चाचणी टीमकडून' पाहणी करण्यात येत आहे. सर्व चाचण्या घेण्याचे काम करण्यात येत आहे. पुतळ्याच्या प्रत्येक भागाचे परीक्षण तसेच तपासणी आयआयटी मुंबईकडून करून घेण्यात आली आहे. एकूणच पुतळ्याच्या सुरक्षेसाठी फडणवीस सरकारने प्रत्येक टप्प्यावर खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे.

नव्या पुतळ्याचे वैशिष्ट्ये :

नव्याने साकारण्यात येत असलेला पुतळा जमिनीपासून 93 फूट उंचीचा आहे. चबुतरा 10 मीटर उंचीचा बनविण्यात आला आहे. त्यावर 60 फूट उंचीचा पुतळा आणि महाराजांच्या हातातील तलवार तब्बल 23 फूट उंचीची असणार आहे. पुतळ्यासाठी कांस्य धातूच्या 8 मिलीमीटर जाडीच्या पत्र्याचा उपयोग केला आहे. याशिवाय यासाठी वापरण्यात येणारे स्टील हे स्टेनलेस स्टील आहे. युद्धभूमीतील युद्धाच्या आवेशातील नवीन शिव पुतळा उभारला आहे. किल्ले सिंधुदुर्गच्या दिशेने पुतळ्याचा दर्शनी भाग आहे. छत्रपतींच्या अंगावर शाल आणि पाठीवर ढाल आहे. या शिव पुतळ्याचे आयुर्मान 100 वर्ष असणार आहे.

एक मे रोजी लोकार्पण होणार?

पुतळ्याचे काम सध्या पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे येत्या एक मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी या पुतळ्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागास अद्यापपर्यंत याबाबतच्या कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, वरिष्ठ स्तरावरून तयारीत रहावे, कोणत्याही क्षणी या पुतळ्याचे लोकार्पण होईल, असे सांगण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT