कणकवली नगरपंचायत निवडणुकीपूर्वी शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी “शहर विकास आघाडी”ची तयारी सुरू झाली आहे.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी या संदर्भात कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.
Sindhudurg News : राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिवसागणिक वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. तळकोकणात सध्यातरी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे. यामुळे अद्याप युतीबाबत कोणतीच घोषणा झालेली नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मात्र भाजपसह राणेंच्या वर्चस्वाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. याबाबत पारकर यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक झाली असून भाजपला शह देण्यासाठी नवी रणनीती आखली जात आहे. यामुळे सध्या कणकवलीत नेमक काय होणार याचीच उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे रणांगण आता तापू लागले असून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वाद वाढला आहे. येथे मंत्री नितेश राणे आणि त्यांचे बंधू आमदार निलेश राणे यांनी आप-आपल्या पक्षासाठी कंबर कसली आहे. फक्त कंबरच कसली नाही तर एकमेकांच्या विरोधा दंड थोपाटले आहेत. यामुळे येथे राणे बंधूंतच वाद सुरू झाल्याचे समोर येत आहे. या वादामुळेच महायुतीत अद्याप जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली नाही. तर युतीबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता असून यानंतरच राज्यात खळबळ उडवून दिलेल्या आघाडीचा येथे निर्णय होणार आहे.
दरम्यान भाजपला दूर ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येऊन “शहर विकास आघाडी” करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. यामुळे राज्यात विरोधात असणाऱ्या दोन्ही शिवसेना स्थानिकला एकत्र येणार असे चित्र निर्माण झाले होते. याबाबत मुंबईतही उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलावून घेत यांचे मत जाणून घेतले. यामुळे भाजपचा काटा दोन्ही शिवसेना मिळून काढणार अशा चर्चा येथे सुरू झाल्या होत्या. पण अद्याप यावर निर्णय झालेला नाही. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून याला हिरवा हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे.
पण भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी केवळ कणकवलीच नव्हे तर सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना ‘महायुती’ व्हायला हवी अशी भूमिका घेतली आहे. तसेच जर कणकवलीत अशी युती झाली तर आपण शिवसेनेशी दोन्ही जिल्ह्यात संबंध तोडू असाही त्यांनी इशारा दिलाय. ज्यानंतर आता येथे दोन्ही पक्षांमध्ये विचारमंथन झाले असून कणकवली नगरपंचायतीमध्येही भाजप-शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्या महायुतीचे संकेत मिळत आहेत.
भाजपकडून शहरातील ढालकाठी येथे सुरू करण्यात येणाऱ्या प्रचार संपर्क कार्यालयाच्या कमानीवर भाजपसहीत शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचेही फोटो झळकले आहेत. यामुळेच येथे महायुती होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भाजप-शिवसेना एकत्र लढणार असल्याची सध्यातरी चर्चा आहे. मात्र यावर अधिकृत कोणतीच घोषणा झालेली नाही. येत्या दोन दिवसांत यावर बैठकी चर्चा होणार असून निर्णय ही होण्याची शक्यता आहे.
पण जर शिंदेंच्या शिवसेनेला आमदार निलेश राणे आणि माजी आमदार राजन तेली म्हणतात त्या पद्धतीने सन्मानाने जागा न दिल्यास येथे शिवसेना वेगळा मार्ग अवलंबू शकते.शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेना जिल्हाप्रमुख आणि कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तयार केलेल्या “शहर विकास आघाडी”त जावू शकते. दरम्यान भाजप विरोधात मोर्चा उघडण्यासह शहरविकास आघाडी स्थापन करण्याबाबत पारकर यांनी हालचालींना वेग दिला असून त्यांनी नुकताच आपल्या निवासस्थानी महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
या बैठकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान शहरातील राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. भाजपविरोधात एकत्र लढण्यासाठी शहर विकास आघाडीची आखणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच बैठकीत आगामी नगरपंचायत निवडणुकीत कोणत्या विभागात कोणत्या उमेदवाराला संधी द्यायची, प्रचाराची दिशा कशी ठेवायची, तसेच एकत्रित आघाडीचे धोरण काय असावे यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व गटांनी एकत्र येऊन कणकवली शहरात सत्ताबदल घडवण्याचा निर्धार केला असून एकसंघ पॅनल उभे करून निवडणुकीत उतरायचे ठरले आहे. यायामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
1. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत कोणता नवा राजकीय फॉर्म्युला तयार झाला आहे?
भाजपविरोधात “शहर विकास आघाडी” नावाची नवी आघाडी तयार करण्यात आली आहे.
2. या आघाडीमागे कोणाचा पुढाकार आहे?
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या पुढाकाराने ही आघाडी तयार होत आहे.
3. भाजपला या आघाडीमुळे किती फटका बसू शकतो?
भाजपविरोधात एकत्र आलेले गट शहरात मजबूत पर्याय निर्माण करू शकतात, त्यामुळे भाजपला आव्हान निर्माण होऊ शकते.
4. बैठकीला कोणते नेते उपस्थित होते?
कार्यकर्त्यांची बैठक संदेश पारकर यांच्या निवासस्थानी झाली असून, विविध स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
5. या आघाडीचे उद्दिष्ट काय आहे?
शहरातील विकासाचा मुद्दा पुढे ठेवत भाजपविरोधात एकत्र येऊन आगामी निवडणुकीत सत्ता मिळवणे हे या आघाडीचे उद्दिष्ट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.