Anand Paranjape-Uddhav Thackeray
Anand Paranjape-Uddhav Thackeray sarkarnama
कोकण

आनंद परांजपेंच्या नावाची फाईल पुढे आली आणि ठाकरेंनी NCP कडे चौकशी सुरू केली...

Yogesh Kute

मुंबई : राज्यातील विविध महामंडळांवर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Govt) तीनही पक्षांच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यावर एकमत झालेले असताना मात्र यासाठीच्या नावांवरून काय वाद होऊ शकतात,याची चुणूक म्हाडातील एका नियुक्तीवरून मिळाली आहे.

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) सभापतिपद हे राष्ट्रवादीकडे देण्यात आले आहे. या पदासाठी मुख्यमंत्र्यांना एक नाव सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात फाईलवर वेगळेच नाव होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बुचकळ्यात पडले. त्यांनीही मग राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे चौकशी सुरू केली. त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्र्यांनी त्या फाईलवर सही केलेली नाही.

राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वाने सर्वानुमते संतोष धुवाळी यांचे नाव निश्चित केले असताना ऐनवेळी आनंद परांजपे (Anand Paranjape) यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढे गेल्याने त्यांनाही आश्चर्य वाटले. परांजपे हे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे खास मानले जातात. त्यामुळे आव्हाड यांनी तर हा बदल केला की काय, अशी चर्चा सुरू झाली. पण पक्षनेतृत्वाने धुवाळी यांच्या नावाचा निर्णय दिला असेल तर आव्हाड असा नावात परस्पर बदल करण्याचा धोका पत्करणार नाहीत. मग खांद्यावर बंदूक ठेवून नेमका कुणी हा नेम साधला आहे, यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

धुवाळी हे राष्ट्रवादीचे वांद्रे येथील कार्यकर्ते आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर सर्वानुमते हा निर्णय झाला होता. त्यानुसार गृहनिर्माण विभागाकडून धुवाळी यांच्या नावाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. धुवाळी यांच्याऐवजी ठाण्याचे राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांच्या नावाची फाईल मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मान्यतेसाठी गेली.

मुंबई म्हाडावर शक्यतो मुंबईतील कार्यकर्ते, नेत्याची नियुक्ती करण्याची परंपरा आहे; पण राष्ट्रवादीने ठाण्यातील व्यक्तीचे नाव पुढे केल्याने त्यांचे हे नेहमीचे धक्कातंत्र असावे या शक्यतेतून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्वाकडे खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांना परांजपे यांचेच नाव अंतिम करायचे आहे अशी माहिती देण्यात आली; पण पुन्हा गोंधळ होऊ नये या भावनेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारमधील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे याबाबत विचारणा केली. नावातला हा बदल ऐकून तेही गोंधळले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना हा निर्णय काही काळ प्रलंबित ठेवावा अशी विनंती केली. तसेच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे नावातील हा बदल आपल्या सूचनेनुसार झाला आहे किंवा कसे याची खातरजमा केली. तेव्हा नावात असा बदल झालेला नसल्याचे स्पष्ट झाले.

‘नेमका कोण?’ याची चर्चा!
पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून संतोष धुवाळी यांना कात्रजचा घाट दाखवायचे राजकारण नेमके कोण करत आहे, अशी चर्चा सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू आहे. तसेच नावातील परस्पर बदलाचे संभाव्य परिणाम काय होतील याची माहिती असल्याने या खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड हे स्वतः असा कुठलाही निर्णय घेतील याची शक्यता नाही. वरिष्ठ पातळीवर सांभाळून घेणारे कुणी असल्याशिवाय मंत्री आव्हाड असे धाडस करणार नाहीत अशी चर्चा आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादीतील नेमका कुणी हा नेम साधण्याचा प्रयत्न केला, याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT