Narayan Rane
Narayan Rane  sarkarnama
कोकण

शिवसेनेचे 20 आमदारही 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून येणार नाहीत ; राणेंचा दावा

सरकारनामा ब्युरो

शिवसेनेचे 20 आमदारही 2024 च्या विधानसभेत निवडून येणार नाहीत ; नारायण राणेंचा दावासिंधुदुर्ग : राज्यसभेच्या निवडणुकीवरुन भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले. "आम्ही विरोधात असूनही एकसंध राहिलो. तुमचीच मते आम्ही फोडली. राज्यात सत्तेत येण्यासाठी 145 मतांची आवश्यकता असते. मात्र, या निकालाने तुम्ही अल्पमतात गेला आहात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे राणे म्हणाले.

"महाविकास आघाडीची जेवढी मते शिवसेनेला मिळायला हवी होती, तेवढीही मते शिवसेनेला सत्तेत असूनही मिळाली नाहीत. तुमचे 8, 9 आमदार फुटतात. तुमची विश्वासार्हता कुठे आहे?, असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला. "राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच मुंबई महापालिकाही भाजपच जिंकेल," असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला. "2024 च्या विधानसभा निवडणुकीत तर शिवसेनेचे जेमतेम 20 आमदारही निवडून येणार नाहीत," असा दावा राणे यांनी केला.

"राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत हे अवघ्या एका मताने जिंकून आले आहेत. ते या निवडणुकीत काठावर पास झाले आहेत. थोडक्यात ते आमच्या हातातून वाचले. अन्यथा शिवसेनेचा उमेदवार जिंकून आला नसता," अशा शब्दात राणेंनी राऊतांना डिवचलं.

"निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे जे नेते वाघाप्रमाणे डरकाळी फोडत होते, ते प्रत्यक्षात शेळीही नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी जी भाषा वापरली नाही, तशी भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली. मात्र, निकालानंतर त्यांच्यावर आता नामुष्की ओढावली आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणे, हे राज्याचे दुर्दैव आहे," असे राणे म्हणाले.

"उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्या पाहिजे, आमदारांची भाजपवर असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे राज्यसभेची ही निवडणूक भाजपने जिंकली," असे राणेंनी नमूद केले.

नारायण राणे म्हणाले, "राज्यसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. फडणवीसांनी माणसे जपली, आमदारांचा विश्वास संपादन केला, असे पवार म्हणाले. खऱ्याला खरे म्हणणाऱ्या शरद पवारांकडून उद्धव ठाकरे यांनी शिकावे, पवारांकडून ठाकरेंनी बोध घ्यावा. मात्र, ठाकरेंचा स्वभाव माहित असल्यामुळे ते सत्य स्वीकारतील, असं वाटत नाही,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT