Narayan Rane, Deepak Kesarkar
Narayan Rane, Deepak Kesarkar Sarkarnama
कोकण

Kesarkar and Rane : राणे-केसरकर यांच्यातील दिलजमाईने सिंधुदुर्गातील राजकारणाला विकासाची दिशा मिळणार ?

सरकारनामा ब्यरो

Deepak Kesarkar work under Narayan Rane : कोकणात नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांना रोजगार देण्यासाठी मोठी चळवळ उभी करू, असे अश्वासन शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दिले. केसरकरांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भाजपचे नारायण राणे आणि शिंदे गटाचे दीपक केसरकर यांच्यात दिलजमाई झाल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

राणे आणि केसरकर यांच्यात आतापर्यंत राजकीय वैर दिसून आले. सत्तांतरानंतर शिंदे गट आणि भाजप (BJP) एकत्र आल्यानंतरही त्यांचातील संघर्ष थांबला नव्हता. दरम्यान, मंगळवारी (ता. ६) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासन आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ सावंतवाडी येथे झाला. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी राज्याचे प्राथमिक शिक्षण मंत्री केसरकर आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे उपस्थित होते.

यावेळी राणे यांनी कोकण पर्यटनक्षेत्रात प्रमुख ठिकाण होण्याची अपेक्षा व्यक्त केली. (Narayan Rane) राणे म्हणाले, "एमएसएमई मंत्री या नात्याने कोकणात अधुनिक उद्योग आणण्यासाठी प्रयत्न आहोत. आतापर्यंत कोकणात विमानतळ, चौपदरी रस्ते, वाढीव रेल्वेगाड्या, पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. आता पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पूर्ण करण्यात येत आहेत. भविष्यात निसर्गरम्य कोकणाचा सर्वांगिण विकास व्हावा, पर्यटनाचे प्रमुख स्थळ व्हावे अशी अपेक्षा आहे."

यावेळी केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राणे यांच्या नेतृत्वात काम करण्याची ग्वाही दिली. केसरकर म्हणाले, "युवकांची अपेक्षा असते की मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावा. त्यासाठी मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्र सरकार मोठा निधी उपलब्ध करून देत असते. कोकणातील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी राणेसाहेब आपल्या नेतृत्वाखाली आम्ही एक चळवळ उभी करणार. त्या माध्यमातून सिंधुदुर्ग स्वयंरोजगाराचे सर्वात मोठे केंद्र ठरेल, अशी कामगिरी पर्यटनाच्या माध्यमातून निश्चितपणे करणार आहे. ते तुम्हाला करून दाखवू, ही ग्वाही देतो."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित केसरकर यांनी नारायण राणे यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याने राणे आणि केसरकर यांच्यातील राजकीय वैर संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. केसरकर-राणे यांच्यातील दिलजमाईने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT