Yogesh Kadam, Uddhav Thackeray And Dapoli Nagar Panchayat sarkarnama
कोकण

Shivena politics : दापोलीत राजकीय घडामोडींना वेग? ठाकरे गटाला मोठा धक्का! नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, दोन नावे चर्चेत

Nagar Panchayat Dapoli Election : दापोली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, 28 मे रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे.

Aslam Shanedivan

Dapoli Nagar Panchayat Election News : दापोली नगरपंचायतीत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला आता मोठा धक्का बसला आहे. येथे नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात 5 मे रोजी विशेष सभेत अविश्वास ठराव 16 विरूध्द 1 अशा बहुमताने मंजूर करण्यात आला. त्याविरोधात त्या उच्च न्यायालयात गेल्या असतानाच नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली असून शिंदे गटात आता रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

दापोली नगरपंचायतीत नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात सर्वच नगरसेवक गेल्याने त्या एकट्या पडल्या आहेत. सध्या नगरपंचायतीत ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Shivsena) एकमेव सदस्य त्या राहिल्या असून ठाकरे गटाची खिंड एकट्या लढवत आहेत. दरम्यान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्याकडे देण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आता उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार घेतला आहे. यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या आदेशामुळे ममता मोरे यांना धक्का बसला असून ठाकरे गटावर नगराध्यक्ष पद सोडण्याची नामुश्की येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून शिवसेनेत (शिंदे) रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शिंदे गटाकडून ज्येष्ठ नगरसेविका कृपा घाग आणि शिवानी खानविलकर यांचे नाव सध्या जोरदार चर्चेच असून गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) कोणाच्या नावाला पसंती देतात हे पाहवं लागणार आहे. तर कृपा घाग या ज्येष्ठ नगरसेविका असल्याने नगराध्यक्षपदी त्यांची वर्णी लागू शकते, अशी शक्यता वर्तवली जातेय. तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते विलास शिगवण हे उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चाही येथे सध्या सुरू आहेत.

दापोली नगरपंचायतीत तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीबरोबर युती झाली होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करत येथील सत्ता शिवसेनेनं आपल्याकडे घेतली होती. तेव्हा मोरे नगराध्यक्ष, तर खालिद रखांगे उपनगराध्यक्ष झाले होते. पण आता रखांगे यांच्यासह ठाकरे गटाचे 4 नगरसेवक शिंदे गटाबरोबर आहेत. त्यामुळे मोरे एकट्या पडल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कोकणात राबविलेल्या ‘ऑपरेशन टायगर’द्वारे दापोलीत योगेश कदम यांनी राजकीय भूकंप घडवून आणला. त्यांनी तीन वर्षांपूर्वी अनिल परब यांनी केलेल्या राजकारणाचा आता सूड घेत सत्तांतर घडवून आणले. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या युवा नगरसेविका शिवानी खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली 14 नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यात ठाकरे गट, शरद पवार गट आणि अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 22 मे रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करणे, दुपारी 2 पर्यंत छाननी, सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज नाकारलेल्या उमेदवारांची यादी नोटीस बोर्डावर लावणे, 16 मे रोजी अर्ज फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांसाठी अपील मुदत, सायंकाळी 5 नंतर वैधरित्या नामनिर्देशन सादर केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करणे, 27 मे रोजी दु. 4 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि बुधवार 28 मे रोजी सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष निवडणूक तसेच आवश्यक असल्यास मतदान व निकाल घोषित करण्यात येणार आहे. दापोली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.

उच्च न्यायालय मागितलीय

दरम्यान ममता मोरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, आपण कोणालाही नगराध्यक्ष पदाचा पदभार दिला नाही. आपल्याविरोधात प्रशासनाकडून अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे भासवले आहे. परंतु प्रत्यक्षात सभागृहात तसा प्रस्ताव मांडलाच गेला नाही. म्हणून या बेकायदेशीर प्रस्तावाच्या विरोधात नगरविकास मंत्रालय व उच्च न्यायालय यांच्याकडे दाद मागितल्याची माहिती मोरे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT