Ratnagiri News : दापोली एसटी आगारातील ई-बसेसच्या ड्युटी व्यवस्थापनावरून खासगी एजन्सीच्या कर्मचाऱ्याला धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. या कथित संभाषणात ‘माझा आदेश म्हणजे योगेश कदमचा आदेश’ असा उल्लेख असल्याचे समोर येत आहे.
व्हायरल कथित ऑडिओ क्लिपमधील आवाज दापोली शहरप्रमुख प्रसाद ऊर्फ पप्पू रेळेकर यांच्यासारखा असल्याची चर्चा आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची अधिकृत सत्यता तसेच आवाज नेमका कोणाचा आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र या क्लिपमुळे दापोलीसह रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ई-बसेसच्या ड्युटीवरून वाद
दापोली एसटी आगारातील ई-बसेसच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एसटी महामंडळाने खासगी तत्त्वावर नियुक्त केलेल्या मोरया ट्रॅव्हल्स एजन्सीकडे दिली आहे. याच एजन्सीच्या कर्मचाऱ्याला ड्युटीचे अलोकेशन आणि ड्युटी रद्द करण्याच्या मुद्द्यावरून धमकावल्याचा दावा या कथित ऑडिओ क्लिपमधून केला जात आहे.
कथित संभाषणात संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख ‘पप्पू रेळेकर’ अशी करून दिल्याचे ऐकू येते. त्यानंतर ड्युटी रद्द केल्याच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त करत वाहनांचे नुकसान करण्याची धमकीवजा भाषा वापरल्याचा दावा केला जात आहे. ‘एक जरी ड्युटी कॅन्सल केलीस तर गाड्या फोडून टाकीन’, तसेच ‘स्टाफसकट जाळून टाकीन’, अशा आशयाची वक्तव्ये कथित संभाषणात ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे.
‘माझा आदेश म्हणजे योगेश कदमचा आदेश’
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ‘माझा फोन आहे, योगेश गौरतला सांग. माझा आदेश आहे. माझा आदेश म्हणजे योगेश कदमचा आदेश, लक्षात ठेव’, अशा आशयाचे वक्तव्य असल्याचा दावा केला जात आहे. तसेच, ‘उपरे-सुपरे आलेत ना, त्यांचे आदेश मला चालत नाहीत’, अशा स्वरूपाची भाषाही संभाषणात वापरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळाला आहे.
कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची धमकी?
संबंधित कर्मचाऱ्याने आपण वरिष्ठांकडून मिळणाऱ्या सूचनेनुसारच काम करत असल्याचे सांगितल्याचे कथित संभाषणातून समोर येते. त्यावर ‘कोण वरचा? तुमच्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट उद्या कॅन्सल करू का?’, असा संतप्त सवाल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संभाषणादरम्यान प्रकल्पप्रमुख गणेश घारे यांचा उल्लेख झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याबाबतही वक्तव्य करण्यात आल्याचे कथित क्लिपमधून ऐकू येते.
ऑडिओची सत्यता अद्याप स्पष्ट नाही
दरम्यान, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपची अधिकृत सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. क्लिपमधील आवाज नेमका कोणाचा आहे, संभाषण नेमके कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाले, तसेच ऑडिओमध्ये केले जाणारे आरोप वस्तुस्थितीला धरून आहेत का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मात्र, ‘माझा आदेश म्हणजे योगेश कदमचा आदेश’ या कथित वक्तव्यामुळे या प्रकरणाची राजकीय चर्चा रंगली असून दापोलीपासून रत्नागिरीपर्यंत या ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता संबंधितांकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते आणि या कथित क्लिपची सत्यता समोर येते का, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.