<div class="paragraphs"><p>&nbsp; Deepak Kesarkar</p></div>

  Deepak Kesarkar

 

sarkarnama

कोकण

पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी पाठवलेली ‘कुमक’ राणेंच्या मदतीला आली अन्‌ भाजपचा विजय झाला!

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक ताब्यातून गेली, तर दिल्लीवरून विचारणा होणार, या भीतीने भाजपच्या राज्यातील पक्षश्रेष्ठींकडून ऐनवेळी पाठवण्यात आलेली ‘कुमक’ केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (narayan Rane) जिल्हा बँकेत विजय मिळवण्यासाठी कामी आली. या विजयामुळे जिल्हा आपल्या ताब्यात आहे, असे म्हणून राणेंनी मिरवू नये. त्यांना जिल्ह्यातील जनता आजही कंटाळलेलीच आहेच, अशी टीका आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सोमवारी (ता. ३ जानेवारी) पुन्हा केली. (Deepak Kesarkar's explanation on Sindhudurg District Bank's election defeat)

जिल्हा बँकेच्या पराभवाला मी जबाबदार आहे, या निवडणुकीसाठी पूर्ण वेळ देऊ शकलो असतो तर निकाल वेगळा असता. मात्र, ज्या पद्धतीने मतदारांना पैशाचे आमिष दाखवण्यात आले, ते पाहता या पुढची लढाई दहशतवादाबरोबरच पैसे वाटपाच्या विरोधात असणार आहे, असेही केसरकर या वेळी म्हणाले. आमदार केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा बँकेतील पराभवावर भाष्य केले. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर आदी उपस्थित होते.

या वेळी केसरकर म्हणाले, "जिल्हा बँकेतील सहा मतदार संघातील मतदानाची आकडेवारी पाहता आमच्या पॅनेलला एकुण २ हजार ४६७ मते मिळाली, तर भाजपच्या पॅनलला २ हजार ३२० मते मिळाली भाजपच्या पॅनेलपेक्षा आमच्या पॅनेलला १४७ मध्ये जास्त मिळाली आहेत. तरीसुद्धा टेक्निकली आमचा पराभव झाला आहे. केवळ छोट्या मतदारसंघातील मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मते फिरविण्यात आल्याने हा प्रकार घडला; अन्यथा हा निकाल वेगळा असता. सिंधुदुर्ग बँक आपल्या ताब्यातून जाणार, असे जेव्हा वाटले आणि दिल्लीवरून विचारणा होणार, या भीतीने भाजपच्या राज्यातील पक्षश्रेष्ठींकडून माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना राणेंच्या दिमतीला पाठविण्यात आले. त्यामुळेच त्यांना या ठिकाणी विजय मिळवता आला."

केसरकर म्हणाले, "सतीश सावंत यांना गाढलाच अशा प्रकारची सोशल मीडियावर केलेले ट्विट अत्यंत चुकीचे आहे. त्यांचा पराभव हा केवळ चिठ्ठीतून दुर्दैवाने झाला आहे. मात्र तरी त्यांचा पराभव झाला तरी त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी त्यांना एक प्रकारे प्रोटेक्शन दिलेच पाहिजे आणि त्यासाठी आपला प्रयत्न असेल. सतीश सावंतांनी लोकांच्या हितासाठी राणेंना अंगावर घेतलेले आहे. त्याचा विचार पक्षश्रेष्ठींनी केला पाहिजे. आम्ही ज्या-ज्या वेळी निवडणूक लढली त्या-त्या वेळी अधिक सावध होतो. त्यामुळे यापुढच्या सर्व निवडणुका आम्हीच जिंकू. मात्र, असे असले तरी निवडणुकीत होणारा पैशांचा वापर, दहशतवाद हे अत्यंत चुकीचे आहे. त्यासाठी या पुढची लढाई ही दहशतवादाबरोबरच पैशाच्या चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या वाटपाविरुद्धही असेल."

राजन तेलींचा राजीनामा हा केवळ दिखावा

राजन तेली यांनी दिलेला राजीनामा हा केवळ दिखाव्यासाठी आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे. त्यांचा सुशांत नाईक या उमद्या नेतृत्वाकडून झालेल्या पराभवाचेही त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. केवळ सुशांत नाईक यांनी केलेल्या मेहनतीमुळे त्यांना हे यश आले आहे असे आमदार दीपक केसरकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT