Eknath Shinde Shivsena; Uday Samant, Sanju Parab And Deepak Kesarkar sarkarnama
कोकण

Deepak Kesarkar : उदय सामंतांनी आमदारकीसाठी NOC मागितली अन् दीपक केसरकरांनी घोषणाच केली, राजकीय चर्चांना उधाण!

Deepak Kesarkar Political Statement Over Family Politics And Constituency Delimitation : नुकताच शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी मंत्री उदय सामंत यांनी संजू परब यांच्या आमदारकीबाबत भाष्य केलं होतं. यानंतर आता आमदार दीपक केसरकर यांचे विधान समोर आले आहे.

Aslam Shanedivan

Sindhudurg News : सिंधुदुर्गच्या राजकारणात सध्या शिवसेनेतील आमदारकीच्या चर्चांनी वेग घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या आमदारकीबाबत केलेल्या विधानानंतर आता माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या एका घोषणेमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. केसरकर यांनी आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती भविष्यात राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सामंतांच्या ‘NOC’ विधानाची चर्चा

उदय सामंत यांनी मागील काही दिवसांत दोन वेळा संजू परब यांच्या आमदारकीच्या चर्चेला हात घातला होता. परब यांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना सामंत यांनी, दीपक केसरकर यांची NOC असेल तर परब आमदार होऊ शकतात, असे सूचक विधान केले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीही त्यांनी याच मुद्द्याचा उल्लेख केला.

परब हे तळागाळात काम करणारे कार्यकर्ते असून, पक्षातील कार्यकर्त्यांना जपणारे जिल्हाप्रमुख असल्याचे सामंत यांनी म्हटले होते. तसेच केसरकर हे ज्येष्ठ नेते असून मतदारसंघाबाबतचा निर्णय घेण्याची भूमिका त्यांची महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

‘केसरकरांची NOC असेल तर परब आमदार होतील’

सामंत यांनी आपल्या वक्तव्यात केसरकर यांच्या संमतीचा विशेष उल्लेख केला होता. केसरकरांसह एकनाथ शिंदे यांनी संधी दिली तर संजू परब शंभर टक्के आमदार होतील, असा दावाही त्यांनी केला होता.

त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आगामी काळात नेतृत्वाची दिशा काय असेल, याबाबत राजकीय चर्चांना सुरुवात झाली. विशेषतः परब यांच्या नावाचा उल्लेख दोनदा झाल्याने या चर्चांना अधिक हवा मिळाली.

अन् आता केसरकरांची मोठी घोषणा

याच पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय चर्चांना नवा ट्विस्ट मिळाला आहे. गणेशोत्सवानिमित्त सावंतवाडी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना एका विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या कुटुंबातील कोणालाही राजकारणात रस नाही आणि भविष्यात कुटुंबातील कोणतीही व्यक्ती राजकारणात येणार नाही, असे स्पष्ट केले.

केसरकर यांच्या या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढला जात असून, आगामी काळातील मतदारसंघ पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

‘तीन पिढ्यांची मालमत्ता समाजकारणासाठी’

दरम्यान, राजकारणातील आपल्या प्रदीर्घ प्रवासाबाबतही केसरकर यांनी भाष्य केले. आमदार झाल्यानंतर आपण कोणतीही जमीन खरेदी-विक्री केलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या तीन पिढ्यांची मालमत्ता समाजकारणासाठी वापरली असून, लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मालमत्ता वाढण्याऐवजी कमी झाल्याचेही त्यांनी म्हटले. गेल्या चार टर्मपासून निरपेक्षपणे जनतेची सेवा करत असून, पुढेही सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीवरही चिंता

राज्यातील पावसाच्या परिस्थितीवरही केसरकर यांनी चिंता व्यक्त केली. पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले. बळीराजासाठी चांगला पाऊस पडावा, यासाठी गणरायाकडे प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुष्काळग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्यात कोकणातील अतिरिक्त चारा पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

परबांच्या आमदारकीची चर्चा, केसरकरांच्या घोषणेमुळे नवा ट्विस्ट

एकीकडे उदय सामंत यांच्याकडून संजू परब यांच्या आमदारकीबाबत केसरकरांच्या ‘NOC’चा उल्लेख होत आहे, तर दुसरीकडे केसरकरांनी आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या दोन्ही विधानांमुळे सावंतवाडी मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांबाबत चर्चांना नवा विषय मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT